दारु घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेवर परदेशातून प्रतिक्रिया येत आहेत. जर्मनीनंतर आता अमेरिकेने केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील विरोधी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर लक्ष ठेऊन आहोत, असं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते म्हणाले की, “केजरीवाल यांच्या अटकेच्या रिपोर्ट्सवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. देशात निष्पक्षपणे कायद्याच्या प्रक्रियेच पालन होईल अशी अपेक्षा आहे” अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते म्हणाले की, “मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विषयात निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेनुसार कायदेशीर प्रक्रियेच पालन होईल अशी अपेक्षा करतो”
केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीने वक्तव्य केलं. त्यानंतर भारताने जर्मनीच्या राजदूतांना बोलवून घेतल व नाराजी व्यक्त केली. या घटनाक्रमानंतर अमेरिकेची या विषयात प्रतिक्रिया आली आहे. केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीने विरोध केला. त्यावर भारताने आक्षेप घेतला. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याला या बद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला की, ‘यासाठी तुम्हाला जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाशी बोलाव लागेल’
भारताने जर्मनीला काय सुनावलं?
या सगळ्या प्रकरणाशी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असं जर्मनीने म्हटलं आहे. केजरीवाल यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय आपले कायदेशीर अधिकार मिळाले पाहिजेत. भारताने जर्मनीच्या या वक्तव्यावर तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला होता. भारताने जर्मनीच्या राजदूताला बोलवून घेत नाराजी प्रगट केली. जर्मन मिशनचे डेप्युटी चीफ जॉर्ज एनजवीलर यांना बोलवून भारताने आपला निषेध नोंदवला. जर्मनीची ही टिप्पणी भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप आहे असं भारताने म्हटलं आहे.