शिव मंदिरात एका मुस्लिम जोडप्याला निकाह करताना पकडल्यानंतर एकच गदारोळ सुरु झाला. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या हिंदू संघटनांनी आंदोलन केलं. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मोदीनगरच्या गोविंदपुरी भागातील हे प्रकरण आहे. शिव शक्ती धाम मंदिराच्या परिसरातील धर्मशाळेत हा निकाह सुरु होता. इतकच नाही, या निकाहसाठी मंदिर समितीने 4200 रुपयांची पावती फाडली होती. शबनम नावाच्या महिलेच्या नावावर ही पावती आहे. उत्तर प्रदेशच्या गाजियबादमधील हे प्रकरण आहे.
शिव मंदिरात मुस्लिम निकाह सुरु असल्याची माहिती मिळताच हिंदू संघटनेचे लोक तिथे पोहोचले. मौलवीकडून निकाह वाचन सुरु होतं. नवरा-नवरीसह अनेक लोक तिथे उपस्थित होते. ही दृश्य दिसताच हिंदू संघटनेच्या लोकांनी तिथे गदारोळ केला. हा हंगामा पाहून मंदिरातून अन्य भाविकांनी लगेच काढता पाय घेतला. निकाहसाठी मंदिरात आलेलं हे जोडपं कुठे गेलं? कोणाल माहित नाही.
हिंदू युवा वाहिनी आक्रमक
हिंदू युवा वाहिनीच्या नीरज शर्मा नावाच्या व्यक्तीने पोलिसात तक्रार केली आहे. या लग्न सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ग्राऊंडमध्ये मुस्लिम समाजातील लोक बसलेले दिसतायत. निकाह झाल्यानंतर लग्नाच सामान गाडीत भरताना दिसतायत. फक्त काही पैशांसाठी मंदिर समितीचे लोक धर्मासोबत खेळतायत असं नीरज शर्माने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. मंदिराकडून पावती घेणाऱ्या आणि निकाहला परवानगी देणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी आहे.
कोणाला ठेका दिलेला?
या प्रकरणात एसपी ज्ञान प्रकाश यांनी माहिती देताना सांगितलं की, हिंदू युवा वाहिनीच्या नीरज शर्मा नावाच्या व्यक्तीने मोदीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिव शक्ति धाम मंदिर ट्रस्टने मनोज सक्सेना नावाच्या व्यक्तीला ठेका दिलाय. तोच तिथे कार्यक्रम आयोजित करतो. मनोज सक्सेनाने मुस्लिम कुटुंबाला लग्नासाठी मंदिर परिसरात धर्मशाळेची जागा दिली होती. या विवाहामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल केला असून ठेकेदार मनोज सक्सेनाला ताब्यात घेतलं आहे अशी माहिती एसपींनी दिली.