डेहराडून: उत्तराखंडमध्ये काँग्रेसकडून (Uttarakhand congress) तिकिटांचे वाटप होण्याआधीच महिला काँग्रेस अध्यक्ष (Congress president) सरिता आर्य (Sarita Arya) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे कॉंग्रेसला निवडणुकीच्या ऐन तोंडावर मोठा धक्का बसला आहे. सरिता आर्य यांच्यासोबतच काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रेखा बोरा गुप्ता आणि वंदना गुप्ता यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
उत्तराखंडमध्ये सरिता आर्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सरिता आर्य यांनी नैनीतालमधून उमेदवारी मिळवून 2012 मध्ये आमदार झाल्या होत्या. त्यांनी याच जागेवरून निवडणूक लढण्याचा आग्रह धरला होता. मात्र यशपाल आर्य यांचा मुलगा संजीव आर्य यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे त्यांची उमेदवारी कमजोर झाली होती. यावरूनच सरिता आर्य यांनी महिलांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसला जाब विचारला होता.
सरिता आर्य यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी त्यांना डेहराडूनमध्ये तिकीट देण्याचं सूतोवाच केलं आहे. सरिता आर्य याआधीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी नुकताच भाजपप्रवेशबाबत खंडन केले होते, त्यानंतर काही वेळातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे, मात्र पुढील वाटचालीविषयी मला माहिती नाही. कारण देशात लोकशाही असून स्वतःविषयी विचार करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त केली जात होती.
काँग्रेसच्या नेतृत्त्वावर साधला निशाना
उत्तरप्रदेशमध्ये 40 टक्के महिला उमेदवारांना तिकीट नाकारल्यानंतर सरिता आर्य यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावर निशाना साधला. उत्तराखंडमध्ये काँग्रेसकडून महिला उमेदवारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरिता आर्य यांनी भाजप नेत्यांसोबत पक्षप्रवेशासाठी चर्चा केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मथुरादत्त जोशी यांनी आर्य यांना काँग्रेस भवनवर आणून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता.
संजीव आर्य यांच्याविरोधात लढल्या होत्या निवडणूक
विधानसभेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये सरिता आर्य यांनी संजीव आर्य यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी संजीव आर्य हे भाजपचे कट्टर समर्थक होते. मात्र यशपाल आर्य यांचे चिरंजीव संजीव आर्य यांच्यासोबत कॉंग्रेसवापसी केल्यानंतर नैनीताल जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलली होती. सरिता आर्य यांनी नैनीतालमधून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला होता. त्याचवेळी संजीव आर्य यांनी आपल्याला नैनीतालमधून तिकीट मिळणार म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सरिता आर्य यांचा काँग्रेसमधून पत्ता कट करण्यात आला होता.