नवी दिल्ली : वंदे भारत एक्स्प्रेस देशातील 14 ठिकाणांवरुन धावत आहे. त्यात मुंबई ते शिर्डी आणि मुंबई-पुणे-सोलापूरचा समावेश आहे. या रेल्वेसंदर्भात प्रवाशांना चांगलेच कुतूहल आहे. यामुळे सर्वच ठिकाणी तिला प्रवाशांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अनेक मार्गांवर ही रेल्वे सुरु करण्याची मागणी केली जात आहे. वंदे भारत ट्रेनची घोषणा झाली तेव्हा आणि प्रत्यक्षात धावताना मोठा फरक दिसून येत आहे. माहितीच्या अधिकारातून या धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे ही देशातील वेगवान ट्रेन क्षमतेप्रमाणे धावत नाही.
काय आहे प्रत्यक्षात परिस्थिती
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची मागणी सध्या अनेक ठिकाणी होत आहे. ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन मानली जाते. या रेल्वेची 180 किमी प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता आहे. परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत धक्कादायक खुलासासमोर आला आहे. देशातील रेल्वे ट्रॅकची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. यामुळे ही रेल्वे क्षमतेच्या निम्म्या वेगाने धावत आहे. सध्या सरासरी ताशी 100 किमी वेगाने ही रेल्वे धावत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या ट्रेनचा सरासरी वेग ताशी ८३ किमी आहे.
प्रत्येक मार्गावर बदलतो वेग
प्रत्येक मार्गावरील रेल्वे ट्रॅकची परिस्थिती भिन्न आहे. यामुळे रेल्वेचा सरासरी वेग बदलतो. याबाबत मध्य प्रदेशातील रहिवासी चंद्रशेखर गौर यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती. त्यांना सांगण्यात आले की 2021-22 मध्ये सेमी-हाय-स्पीड ट्रेनचा सरासरी वेग 84.48 किमी प्रतितास होता. तर 2020-23 मध्येही हाच वेग आहे.
सर्वात कमी वेग मुंबईत
मुंबई सीएसएमटी – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचा सरासरी वेग सर्वात कमी आहे. येथे ते ताशी सुमारे 64 किलोमीटर आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या देशातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा वेग सर्वात वेगवान सरासरी आहे. ही नवी दिल्ली-वाराणसी दरम्यान धावत आहे. ही ट्रेन सरासरी 95 किमी प्रतितास वेगाने धावते. त्यानंतर राणी कमलापती (हबीबगंज)-हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेस 94 किमी प्रतितास या सरासरी वेगासह दुसऱ्या स्थानावर आहे.
ट्रेनची स्पीड 130 किमी
वंदे भारत रेल्वेचे डिझाईन RDSO ने केले आहे. यासंदर्भात अधिकारी म्हणतात, देशातील रेल्वे ट्रॅकची परिस्थिती गाडीचा वेग 180 किमी प्रतितास घेऊ शकेल, अशी नाही. यामुळे 130 किलोमीटर प्रतीतास वेगाने ही गाडी धावत आहे. गाडीचा वेग रेल्वे ट्रॅकच्या परिस्थितीवर अवलंबून असतो.
1128 प्रवासी क्षमता
या ट्रेनच्या मोटर असलेल्या कोचमध्येही प्रवासी सामावू शकतात. तसेच ही ट्रेन वीजेवर धावणारी असल्याने पॉवर जनरेटर कार जोडायची गरज राहत नाही. त्यामुळे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी पेक्षा जादा आहे. एकूण 1128 इतकी प्रवासी क्षमताआहे.
हे ही वाचा
वंदे भारतप्रमाणे आता वंदे मेट्रे, किती असणार भाडे, मुंबई-पुणे कधी सुरु होणार?