भोपाळ : भारतीय रेल्वेची सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस अल्पवधीतच लोकप्रिय झाली. यामुळे अनेक मार्गांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रातून मुंबई- गांधीनगर, मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. तसेच मुंबई शिर्डी अशीही ट्रेन सुरु आहे. आता गोव्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. देशभरात आतापर्यंत १५ पेक्षा जास्त वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. परंतु या गाडीवर दगडफेकीच्या घटना वारंवार घडत आहे.
आता कुठे झाली दगडफेक
आता मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली आहे. अज्ञात लोकांकडून ही दगडफेक करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसवर आठवडाभरापासून दगडफेकीचे प्रकार होत आहे. परंतु स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती दिली जात नव्हती. आता दगडफेकीचा प्रकार वाढल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. या दगडफेकीत पाच डब्यांचे नुकसान झाले आहे. ३० खिडक्यांची काचे फुटली आहेत. आता रेल्वेकडून या खिडक्यांची दुरुस्ती हात घेतली आहे.
आरपीएफकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध
आरपीएफ आणि जीआरपीकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या युवकांकडून ही दगडफेक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक प्रकरणांमध्ये रेल्वे ट्रॅकच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडूनच दगडफेक झाल्याचे स्पष्ट झाले होते.
दगडफेकीचा असाही होता प्रकार
बंगळुरमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्या एका 36 वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याचे नाव अभिजीत अग्रवाल आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीत त्याने सांगितले की, मला वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यासाठी देवाकडून आदेश येत होता. त्यानंतर मी दगडफेकत होतो. वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकल्यामुळे मला जेवण मिळत होते.
मेक इन इंडिया ट्रेन
देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे.