देशात सर्वात लोकप्रिय ठरलेली वंदे भारत ट्रेनची मागणी वाढत आहे. देशात आता शंभरापेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन धावत आहेत. महाराष्ट्रातून पहिली वंदे भारत ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर आता एकूण आठ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. राज्यात सध्या मुंबईपासून सोलापूरपर्यंत, मुंबईपासून शिर्डीपर्यंत, मुंबईपासून जालनापर्यंत, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. परंतु लवकरच मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर ही ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जानेवारी 2024 मध्ये मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत सुरू होणार असल्याचे म्हटले होते. परंतु अजूनपर्यंत सुरु झालेली नाही. आता काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर शहराला लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातून नववी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे.
माध्यमांमधील वृत्तानुसार, लोकसभा निवडणुका संपल्यानंतर केंद्रात नवीन सरकार येणार आहे. नवीन सरकारच्या काळात वंदे भारत सुरू करू शकते. मुंबईवरुन कोल्हापूरपर्यंत आणि कोल्हापूरवरुन मुंबईपर्यंत ही सेमी हाय स्पीड ट्रेन धावणार आहे. यामुळे कोल्हापूरमधील अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून धार्मिक स्थळे जोडली जात आहे. मुंबई ते शिर्डी यापूर्वी एक वंदे भारत सुरु आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. मेक इन इंडिया असणारी ही ट्रेन ताशी १६० किमीपर्यंत धावू शकते. परंतु सध्या अनेक मार्गांवर १०० ते १२० प्रतीतास किलोमीटर वेगाने धावत आहेत. मुंबई ते अहमदाबाद ट्रेन १६० किमी वेगाने धावण्यासाठी तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. त्यासंदर्भात चाचणी सुरु आहे.