Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत ही लोकप्रिय ठरलेली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वंदे भारत स्लीपर ट्रेनची चर्चा सुरु आहे. आता या ट्रेनची ट्रायल झाली आहे. मुंबईवरुन अहमदाबाद अशी ही ट्रेन आहे. अहमदाबादवरुन सकाळी 7:29 वाजता ही ट्रेन निघाली. दुपारी1:50 वाजता मुंबई सेंट्रलला पोहचली. ही ट्रेन 130 किमी प्रतितास वेगाने धावली. ट्रायल रनमध्ये ट्रेन 180 किमी धावू शकतो. या ट्रेनची मागील तीन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी ट्रायल झाल्या.
रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन चाचण्या पूर्ण केल्यानंतर पुढील आठवड्यात अंतिम प्रमाणपत्र जारी करेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर वंदे भारत स्लीपर कोच कधीपासून सुरु करायची यासंदर्भात निर्णय रेल्वे बोर्ड घेईल. त्याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रॅकवरील चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता या ट्रेनच्या अधिक प्रगत चाचण्या करण्यात येतील. यामध्ये 130 किमी प्रतितास वेगाने कन्फर्मेटरी ऑसिलोग्राफ कार रन (COCR) नावाची चाचणीचा समावेश असणार आहे. ट्रॅक कंडिशन, सिग्नलिंग सिस्टीम, ट्रॅक्शन डिस्ट्रिब्युशन इक्विपमेंट आणि इंजिन आणि कोचची एकूण फिटनेस यासारख्या अनेक पॅरामीटर्सचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गापूर्वी वंदे भारत ट्रेनची चाचणी झाली आहे. 2 जानेवारी रोजी राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील कोटा आणि लबान दरम्यानच्या 30 किमी अंतरावर चाचणी घेण्यात आली होती. तिथे ट्रेनने 180 किमी प्रतितास इतका वेग गाठला. याआधी 1 जानेवारी रोजी रोहळ खुर्द ते कोटा दरम्यानच्या 40 किमी अंतरावर ताशी 180 किमीचा वेग नोंदवण्यात आला होता. कोटा-नागदा सेक्शनवर ताशी 170 किमी आणि रोहल खुर्द-चौमळा सेक्शनवर 160 किमी प्रतितास वेग गाठला गेला. या चाचण्या आरडीएसओच्या देखरेखीखाली घेतल्या जात आहेत. चाचण्यांनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ट्रेनचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. सर्व चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतरच नियमित सेवेसाठी प्रमाणित केले जाईल. त्यानंतर ही ट्रेन मार्गावर येणार आहे.