Vasundhara Raje BJP President: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दीर्घ काळापासून विचारमंथन सुरु आहे. जे.पी.नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे अन् त्यांची मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांची नियुक्ती होणे, यानंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षांचा शोध सुरु झाला. मध्यंतरी महाराष्ट्राचे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झाली. परंतु अजून कोणाचे नाव निश्चित झाले नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळची नसलेल्या व्यक्तीचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव समोर आले आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री भाजप नेत्या वसुंधरा राजे यांचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुढे आणले गेल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे वसुंधरा राजे अध्यक्ष झाल्यास भाजपच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष ठरणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला होता. केंद्रात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर नड्डा यांना केंद्रीय मंत्री करण्यात आले. त्यानंतर भाजप अध्यक्षपदासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे प्रमुख मोहन भागवत राजस्थानमधील अलवर येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत वसुंधरा राजे नेहमी होत्या. त्यानंतर वसुंधरा राजे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आरएसएसने वसुंधरा राजे यांचे नाव पुढे केले आहे. यापूर्वी संघाकडून संजय जोशी यांचे नाव दिले गेले होते. परंतु भाजपकडून त्या नावावर सहमती मिळाली नाही. नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांच्याच चांगलेच मतभेद आहेत. आता संघाकडून वसुंधरा राजे यांचे नाव आले आहे. परंतु मोदी आणि अमित शाह यांच्याशी वसुंधरा राजे यांची संबंध चांगले नाही. 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. परंतु त्यांच्याऐवजी भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात आले.
मोदी अन् शहा यांच्याशी वसुंधरा राजे यांचे संबंध चांगले नसताना त्यांचे नाव संघाकडून पुढे का आले? हा प्रश्न आहे. त्याचा अर्थ संघाला संतुलित राजकारण हवे आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान जे.पी.नड्डा यांनी भाजप आता मोठा झाला आहे. भाजपला संघाची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजे यांना अध्यक्ष करुन संघाला भाजपमध्ये आपली पकड मजबूत करायची असल्याचे म्हटले जात आहे.