नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणी पूर्णपणे संपल्याचं दिसतंय. इतकंत नाही तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आता सख्य वाढताना पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भेटीगाठी आणि बैठकांमुळे हे सख्य अधिक उठून दिसत आहे. हे सख्य दाखवणारा अजून एक व्हिडीओ समोर आलाय. आप आये बहार आयी, अशा शब्दात संजय राऊत राहुल गांधींचं स्वागत करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
पावसाळी अधिवेशनातील गोंधळावरुन लोकसभेतील 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यात शिवसेना, काँग्रेस, सीपीएम, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआयच्या खासदारांचा समावेश आहे. हे सर्व खासदार निलंबनाच्या कारवाईविरोधात संसद परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनला बसलेले आहेत. या आंदोलक खासदारांच्या भेटीसाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी विविध पक्षाचे बडे नेते इथे येत आहेत. त्यानुसार राहुल गांधीही याठिकाणी आले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या संजय राऊत यांनी ‘आप आये बहार आयी’ म्हणत त्यांचं स्वागत केलं. यावेळी राहुल गांधी यांनीही त्यांच्या या स्वागताला दाद दिली. त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Shivsena leader @rautsanjay61 while receiving @RahulGandhi at Gandhi Statue said that .. ‘ आप आए.. बहार आई…’ pic.twitter.com/9ACkj9Op0J
— Anand Prakash Pandey (@anandprakash7) December 14, 2021
दरम्यान, आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनीही या खासदारांची भेट घेत त्यांना समर्थन दिलं होतं. त्यावेळी संजय राऊत यांनी पवारांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली होती. हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोवरुन राज्यातील भाजप नेत्यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधत खोचक टीका केली होती. भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊतांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर दिल्लीत भाजप महिला नेत्याकडून संजय राऊतांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना
अनिल देसाई, शिवसेना
फुलो देवी नेताम, काँग्रेस
छाया वर्मा, काँग्रेस
रिपुन बोरा, काँग्रेस
राजामणि पटेल, काँगेस
सैय्यद नासिर हुसेन, काँग्रेस
अखिलेश प्रसाद सिंह, काँग्रेस
एलामरम करिम, सीपीएम
डोला सेन, तृणमूल काँग्रेस
शांता छत्री, तृणमूल काँग्रेस
बिनय विश्वम, सीपीआई
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायद्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता. 12 ऑगस्ट रोजी संसदेत हायव्हेल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये उतरले होते. या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातल्याने त्यांना आवरण्यासाठी पहिल्यांदाच संसदेत मार्शलला बोलावण्यात आलं होतं. सभागृहात कागद भिरकावणे, फाडणे आणि टीव्ही स्क्रिन तोडण्याचा या खासदारांवर आरोप आहे. या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केले होते. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस, टीएमसी, सीपीआय आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश होता. गोंधळ केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या 6 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यात शिवसेनच्या 2 खासदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांचाही समावेश आहे.
इतर बातम्या :