बंगळूर | 21 मार्च 2024 : भारतात काही शहरांची ओळख आयटी सिटी म्हणून झाली आहे. पुणे, बंगळूर, हैदराबाद ही शहर माहिती आणि तंत्रज्ञान नगरी म्हणून ओळखली जात आहे. यामधील बंगळूरमध्ये पाण्याची बिकट अवस्था झाली आहे. शहरात अंघोळीला नाही तर चेहरा धुण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर अन् लोकांना पाणी मिळत नाही. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास नकार दिला आहे. त्याचा परिणाम कंपन्यांच्या दैनंदिन कामावर होत आहे. कर्मचारी कार्यालयात येत नसल्यामुळे कंपन्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
बंगळूर शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. बंगळूरमध्ये विप्रो, इन्फोसिससारख्या दिग्गज आयटी कंपन्यांचे मुख्यालय आहे. परंतु रोज पाण्याचे संकट शहरात उभे राहिले आहे. सर्व परिसरात नळांमधून पाणी येत नाही. टँकरसाठी लांबच्या लांब रांगा दिसत आहेत. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढल्यामुळे शहरात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत शहरात पाऊस पुरेसा झालेला नाही. या सर्व बाबींचा परिणाम पाण्यावर झाला आहे.
सोशल मीडियावर बंगळूरमधील पाण्याची गंभीरता दाखवणारे अनेक व्हिडिओ आले आहे. पाणी नसल्यामुळे पाण्याचे रेशन झाले आहे. गृहनिर्माण संस्थांनी पाण्यासंदर्भात एडवाइजरी जारी केली आहे. पाणी मिळवण्यासाठी लोक कामे सोडून रांगेत उभे राहत आहे. यामुळे कार्यालयात येण्यास कर्मचारी नकार देत आहेत. यामुळे कंपन्यांना पुन्हा रिमोट वर्किंग सुरु करावे लागले आहे.
बंगळूर शहरातील 13,900 पैकी 6,900 बोअरमध्ये एक थेंबही पाणी नाही. हे बोअरवेल पूर्ण कोरडे पडले आहे. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पाच वर्षांत बंगळूरमधील 70% हिरवळ कमी झाली आहे. अजून चार दिवस शहरातील पाण्याची अशीच परिस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे.