आम्ही मदत करण्यास तयार अन्यथा गंभीर परिणाम, राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

| Updated on: Apr 11, 2024 | 8:46 PM

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका मुलाखतीत बोलताना पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक शब्दात इशारा दिला आहे. पण त्यांनी जर मदत हवी असेल तर ती करायला देखील तयार असल्याचं म्हटलं आहे. काय म्हणाले राजनाथ सिंह वाचा सविस्तर

आम्ही मदत करण्यास तयार अन्यथा गंभीर परिणाम, राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
india on pakistan
Follow us on

Rajnath singh on Pakistan : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे. याशिवाय राजनाथ सिंह यांनी मदतीचा प्रस्तावही दिलाय. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटले की, दहशतवादाचा वापर करून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा आणि तो हे करण्यास सक्षम नाही असे वाटत असेल तर भारत दहशतवाद रोखण्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे.’ दहशतवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला मदत देऊ असं म्हणत असताना आपल्या भूमीतून दहशतवाद संपवला पाहिजे आणि जर त्याला वाटत असेल की ते तसे करू शकत नाही तर ते भारताची मदत घेऊ शकतात.’

दहशतवाद खपवून घेणार नाही

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी म्हटले की, सीमेपलीकडील दहशतवाद खपवून घेणार नाही आणि इस्लामाबादशी संबंध सुधारण्यासाठी दहशतवादाकडे दुर्लक्ष करू शकत नाही यावर भारताने वारंवार भर दिला आहे. दहशतवाद, शत्रुत्व किंवा हिंसाचार नसलेले वातावरण निर्माण करणे ही इस्लामाबादची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संरक्षण मंत्री म्हणाले की, ‘पाकिस्तान दहशतवादाच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो, पण असं केलं तर आता त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे. ते आमचे शेजारी आहेत आणि जर त्यांचा हेतू स्पष्ट असेल की दहशतवाद संपला पाहिजे, तर त्यांनी ते स्वतः करावे किंवा भारताची मदत घ्यावी. आपण एकत्र येऊन दहशतवाद संपवू शकतो. पण हा त्यांचा निर्णय आहे, मी फक्त एक सूचना देत आहे.

भारतीय हद्दीत घुसु देणार नाही

नुकत्याच एका टीव्ही मुलाखतीत दिलेल्या त्यांच्या ‘घुस के मरेंगे’ या विधानाबद्दल विचारले असता, राजनाथ सिंह म्हणाले की, भारत दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

ते म्हणाले, ‘आम्ही दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसु देणार नाहीत. त्यांना रोखण्यासाठी आम्ही पाऊले उचलू. सीमेपलीकडूनही अशी कारवाई होऊ शकते का, असे विचारले असता ते म्हणाले, काय होते ते पाहू.

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये भारताने नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन दहशतवादी प्रक्षेपण पॅडवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यानंतर पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता.