एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावरून मोदी सरकारवर टीका केलीये. या दुरुस्ती विधेयकाविरोधात त्यांनी आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, आम्ही एक मशीद गमावली आहे. त्यामुळे लवकरच वक्फ वाचवण्यासाठी आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे औवेसी यांनी सांगितले. ओवेसी यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी, तुम्हाला मुस्लिमांसाठी केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डात गैर-मुस्लिम सदस्य का बनवायचे आहेत? प्रत्येक धर्माला आपापला धर्म पाळावा लागतो हीच या देशाची ताकद आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ निवडणुकीत पराभूत होऊ नये म्हणून मुस्लिमांना टार्गेट करत आहेत.
तेलंगणातील महबूबनगरमध्ये ओवेसी बोलत असताना म्हणाले की, वक्फचा मुद्दा देवबंदी, बरेलवी आणि अहल-ए-हदीसचा नसून संपूर्ण मुस्लिमांचा मुद्दा आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारायचे आहे की वक्फ तयार झाला तर माझ्या मालमत्तेचे संरक्षण कोणत्या कायद्याने केले जाईल?
ओवेसी म्हणाले, हिटलरच्या काळात जर्मनीत ज्यूंना ज्याची पुनरावृत्ती झाली, आज त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आपल्या देशातील मुस्लिमांसोबत केली जात आहे. भाजपचे लोक म्हणतात की, 8 लाख एकर जमीन वक्फची आहे, मग ऐका, ही जमीन कोणत्याही सरकार, आरएसएस, भाजप किंवा राजकीय पक्षाने दिली नसून आमच्या वडिलांनी दिली आहे. महाराष्ट्रात ज्यांनी एका वयोवृद्ध मुस्लीम माणसावर प्राणघातक हल्ला केला ते पोलिसात भरती होण्यासाठी परीक्षेला बसले होते, मुस्लिमांवर अत्याचार करणारे गुंड नेहमीच टोळक्याने येतात. अशी टीका ही त्यांनी केली.
अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले आहे. आता जेपीसीकडे ते पाठवण्यात आले आहे. विरोधी पक्षांकडून या विधेयकाला जोरदार विरोध होत आहे. काही प्रमुख मुस्लीम संघटनांकडून वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर तीव्र टीका होत असताना, भाजपची अल्पसंख्याक आघाडी वक्फ बोर्डातील सुधारणांसाठी मुस्लिमांकडून सूचना मागवणार आहे आणि त्या विधेयकाची तपासणी करणाऱ्या संसदीय समितीसमोर मांडणार आहे.