मुंबई – एकनाथ शिंदेंसोबतचे (Eknath Shinde)शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीत काय करत आहेत, असा प्रश्न आपल्या अनेकांच्या मनात असेल. तिथल्या रेडिन्सन ब्ल्यू या हॉटेलात त्यांची शाही व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी शिवसेना आमदारांना (Shivsena MLA) देण्यात येत असलेली ट्रिटमेंट ही फारच चांगली असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ७० ते ८० जणांचा गोतावळा सध्या त्या ठिकाणी आहे. या सगळ्या परिस्थितीचे वर्णन शिवसेनेचे बंडखोर उमेदवनार शहाजीबापू (Shahajibapu)यांनी केले आहे. त्यांच्या सांगोला मतदारसंघातील कार्यकर्त्याशी त्यांच्या झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होते आहे. त्यात सुरुवातीलाच त्यांनी गुवाहाटीतील स्थितीचे वर्णन करत तिथे सगळं काही ओके असल्याचे त्यांच्या खास भाषेत सांगितलेले आहे.
शहाजीबापू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संभाषणात सुरुवातीलाच त्यांनी गुवाहाटीतील स्थिती सांगितलेली आहे.
नेते नमस्कार
कार्यकर्ता- नमस्कार नमस्कार
कार्यकर्ता- कुठे आहेत नेते तीन दिवस झालेय फोन लावतोय
शहाजीबापू – आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे.
कार्यकर्ता- बरं
शहाजीबापू- काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्के मध्ये आहे.
कार्यकर्ता इथं टिव्हीवर आम्ही बघतोय, तुमचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही. एवढा सारा घटनाक्रम तुम्ही बोलायचं तर. थोडी तरी सांगायचं तर
शहाजीबापू – नाय नाय नाय… हॅलो.. नेत्यांचा आदेश होता. कुणाला फोन करू नका. पण आता इतकं काही झाल्यावर मलाही करमना. मी म्हणलो. तालुक्यात कुणाला तरी बोलू. काय चाललंय काय नाय. बरं तालुका कसा आहे
कार्यकर्ता – इथं सर्व ओके आहे. सर्वानी तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. मी काल पुण्याहून आलो. कार्यालयावर गर्दी होती. सर्वांना वाटतंय बांपूंना संधी मिळतेय.
शिवसेनेचे बंडखोर आमदार राहत असलेल्या रेडिसन ब्ल्यू या हॉटेलात ७० रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. त्याही सात दिवसांसाठी या बुकिंगवर ५६ लाख रुपये खर्च करण्यात आल्या आहेत. त्यानंतर जेवणा खाण्याचा खर्च वेगळाच आहे. आत्तापर्यंत या व्यवस्थेवरच १.१२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती आहे.
या हॉटेलातील जे फोटो समोर येतायेत. त्यावरुन हॉटेल किती महागडे आहे, याची कल्पना येऊ शकते. त्यासोबतच बाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काल आलेल्या तीन बंडखोर आमदारांसाठी विमानतळावरील व्हीव्हीआयपी एक्झिट वापरण्यात आल्याीही माहिती आहे. त्या गेटचा वापर केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासाठीच करण्यात येतो अशा गेटमधून या आमदारांना एक्झिट दिल्याची माहिती आहे.
आसाममध्ये दुसऱ्या राज्यातील आमदारांना देण्यात येत असलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटला स्थानिक जनतेतून विरोधही करण्यात येतो आहे. हा खर्च इथे न करता, आसाममध्ये आलेल्या पूरस्थितीवर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येते आहे. यासाठी तृणमूल काँग्रेसच्या वतीने काल हॉटेलबाहेर निदर्शनेही करण्यात आली आहेत.