मुख्यमंत्रीपदाबाबत RSS ने काय दिला फॉर्म्युला, कोण होणार मुख्यमंत्री?

| Updated on: Nov 26, 2024 | 5:16 PM

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेंस वाढत चालला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आणि भाजप दोघेही आग्रही आहेत. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत होणार असून आरएसएसने देखील भूमिका मांडल्याचं कळतं आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत RSS ने काय दिला फॉर्म्युला, कोण होणार मुख्यमंत्री?
Follow us on

Maharashtra New CM : महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. राज्याचा कारभार कोणाकडे जाणार हे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. सध्या ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. या दरम्यान शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीचा नवा फॉर्म्युला दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केले जाणार की नाही हे अजून कळालेले नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. पण त्यांची कोणाशीही भेट झाली नाही. एका खाजगी कार्यक्रमासाठी ते गेल्याचं बोललं जात आहे. गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईत येणार असल्याचं देखील बोललं जात होते. पण ते देखील आज मुंबईत येण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत मुंबईत बैठका झाल्या. मात्र दिल्लीतच यावर निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार पंतप्रधान मोदींना एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची विनंती करणार आहेत.

महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु आहे. या दरम्यान आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्लीत भाजप हायकमांडसोबत बैठक घेतल्याची बातमी सूत्रांकडून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची शिफारस सरसंघचालकांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही काल दिल्लीत सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला राहू शकतो. पंरतून अडीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद वाटलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे. पहिली अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कमान जाऊ शकते. या सगळ्या शक्यता आणि चर्चा आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप फडणवीस यांच्या नावासाठी आग्रही आहे. दुसरीकडे शिंदेंचे नेते ही एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आहे.