बंगळुरु : भारताचा तिरंगा चंद्रावर फडकणार आहे. बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चा विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. त्यानंतर लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर येऊन काम सुरु करेल. चंद्रावर छाप उमटवण्यासाठी इस्रोने पूर्ण तयारी केली आहे. भारताला यश मिळाल्यास दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन काय मिळणार. पाण्याचा शोध घेणं हाच उद्देश आहे की. अजून काही जाणून घ्या.
आपण चंद्रावर मानवी वस्ती करण्याबद्दल ऐकून आहोत. चंद्रावर मानवी वसाहती स्थापित होणार किंवा चंद्रावर जमीन किती महागड्या किंमतीला विकली गेली, हे आपण वाचलय. ही सगळी भविष्याची लढाई आहे. त्यामुळे वेगवेगळ्या अवकाश संशोधन संस्था झपाटून कामाला लागल्या आहेत.
हीलियम-3 महत्त्वाचा घटक
दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेणं हा चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-3 चा उद्देश आहे. मात्र, त्याशिवाय अनेक पैलू आहेत, ज्याची इस्रोने तयारी केलीय. चंद्रावर मानवी वस्ती आणि पाण्याशिवाय तिथल्या अन्य घटकांवर सुद्धा भर देण्यात येत आहे. यात हीलियम-3 आहे. त्याशिवाय जगाला उपयोगी ठरतील, अशा काही गोष्टी तिथे असू शकतात. “दक्षिण ध्रुवावर मोठ्या प्रमाणात पाणी असू शकतं. पावर जनरेटर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. या भागाची टोपोग्राफी पूर्णपणे वेगळी आहे” असं इस्रोचे माजी ग्रुप डायरेक्टर सुरेश नाइक म्हणाले.
इलेक्ट्रिसिटी निर्मितीला पूरक ठरणारा घटक चंद्रावर
चंद्रावर असाही भाग आहे, जो पूर्णपणे झाकलेला आहे. उंचवटा आहे. काही भागात सूर्यप्रकाश येतो. तिथे मानवी वस्ती होऊ शकते. चीन त्या दिशेने संशोधन करतोय. चंद्रावर अनेक घटक आहेत. यात हीलियम-3 महत्त्वाचा आहे. पॉल्यूशन रहित इलेक्ट्रिसिटी निर्मितीसाठी हा घटक महत्त्वाचा आहे. पुढच्या 2-3 वर्षात चंद्रावर जाण्याच्या शर्यतीला आणखी वेग येईल. पुढच्या 2 वर्षात चंद्रासाठी 9 ते 10 मिशन्स लॉन्च होणार आहेत.
चंद्रावर स्कॅडियम, येट्रियमसह अनेक धातू आहेत. पृथ्वीवर हे धातू मिळत नाहीत, असा एका संशोधनात दावा करण्यात आला आहे. माणसासाठी चंद्रावर भरपूर शक्यता आहेत. म्हणून चंद्रावर पोहोचण्याची शर्यत अधिक वेगवान झाली आहे. पाणी, हेलियम आणि त्यापासून बनणारी एनर्जी हे महत्त्वाचे घटक आहेत.