What India Thinks Today: आपल्या देशात बेरोजगारीचा मुद्दा मोठा आहे. गेल्या दीड वर्षापासून चीनने भारतात घुसखोरी केली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा दहशतवाद वाढवला जात आहे. काश्मीरमध्ये राहत असलेल्या काश्मिरी पंडितांवर हल्ले वाढत आहेत. अग्निपथ योजनेवरून (agneepath scheme) तरुणांमध्ये प्रचंड संताप आणि राग आहे. देशाच्या समोर आव्हाने आहेत. आपला संताप व्यक्त करण्यासाठी तरुणांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. त्याला जबाबदार कोण आहे? सिकंदराबादपासून ते अलिगड, प्रयागराजमध्ये तरुण रस्त्यावर उतरले आहे. आम्ही तर हिंसेला विरोध केला आहे. तुम्ही चुकीचा निर्णय घेतला अन् लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्याला पंतप्रधानच जबाबदार आहेत. दोन वर्षापासून एकही रिक्रूटमेंट करण्यात आली नाही, अशा शब्दात एमआयएमचे (AIMIM) नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर टीका केली.
TV9ने आयोजित केलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट (What India Thinks Today Global Summit)मध्ये असदुद्दीन ओवैसी बोलत होते. केंद्रातील भाजप सरकारने देशातील वास्तवाच्या विरोधात संघर्ष पुकारला आहे. भारतातील एक मोठा वर्ग भीतीखाली जगत आहे. प्रयागराजमध्ये लोकांची घरे तोडण्यात आली आहेत. भाजपच्या एका नेत्याने लोकांना चिरडलं. त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. तुम्ही कुणाला पकडत असाल तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा. त्याला बेसबॉलच्या बॅटने मारण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिला? घर तोडण्याची परवानगी कोणतं सरकार देतं? कोर्ट सुद्धा घरे तोडण्याची परवानगी देत नाही, असं ओवैसी म्हणाले.
आम्ही तर नेहमीच हिंसेला विरोध केला आहे. तुम्ही चुकीचा निर्णय घेतल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले. त्याला जबाबदार पंतप्रधान आहेत. तुम्ही दोन वर्षात एकही भरती केली नाही. चार वर्षात तरुण करतील काय?
नेमकं कारण काय आहे हे पाहण्याची आवश्यकता आहे. तुम्ही ते पाहायला हवं, असंही ते म्हणाले.
माझ्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. मी कधीच कोणावर आरोप केला नाही. द्वेषाची मानसिकता असलेल्या लोकांनी हे कृत्य केलं असेल एवढंच मी वारंवार सांगत होतो. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, असं सांगतानाच हिंसा होऊ नये, असंही ते म्हणाले. भाजपसमोर आता काँग्रेस काहीच बोलू शकत नाही. त्यामुळे ही अवस्था झाली आहे. काँग्रेसने बोलायला हवं होतं. देशाच्या पंतप्रधानांनी अग्निपथ योजनेचा घेतलेला निर्णय चुकीचा होता हे सांगायला हवं होतं. काँग्रेस बोलली नाही. सरकारने निर्णय घेतला. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि देशाच्या अनेक राज्यात हिंसा भडकली आहे, असं त्यांनी सांगितलं.
तुम्ही मुस्लिमांचे नेते आहात काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. असदुद्दीन ओवैसी मुस्लिमांचे नेते नाहीत आणि कधीही होणार नाही. मला हैदराबादच्या जनतेने विजयी केलं आहे. मी सदैव गरीब आणि शोषितांची सेवा करेन. तुम्ही आजही मुस्लिमांच्या प्रामाणिकपणावर संशय घेत आहात. या देशाशी प्रामाणिक राहण्यासाठी मी अल्लाहच्या नावाने शपथ घेतली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.