नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 न्यूज नेटवर्कने दिल्लीत व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं आहे. कालपासून ही कॉन्क्लेव्ह सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी या कॉन्क्लेव्हमध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. तसेच आपली भूमिका मांडली आहे. भारत, जग, विकास आणि अर्थव्यवस्था या अनुषंगाने सकाळपासून या कॉन्क्लेव्हमध्ये चर्चा सुरू आहे. सकाळी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी आपले विचार मांडले. तर, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं आहे.
नारी शक्ती विकसित भारत या विषयावर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आपलं म्हणणं मांडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक कामे केली आहेत. तब्बल 20 वर्षांपूर्वी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी महिलांची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्येच झाली पाहिजे यासाठी काम केलं. मोदींनी महिलांची क्षमता ओळखली आणि त्यांना नवीन ओळख दिली, असं स्मृती ईराणी म्हणाल्या. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या संदेशखालीत सुरू असलेल्या हिंसेवरूनही टीका केली. धर्म आणि वय पाहून महिलांवर अत्याचार केले जात आहेत. जगात कुठेच असं घडलं नाही, असा संताप स्मृती ईराणी यांनी व्यक्त केला.
मोदींनी महिलांना अर्थव्यवस्थेत बरोबरीची भागिदारी दिली. स्त्रियांचं हितो होईल आणि त्यांना बळ मिळेल असे अनेक कार्यक्रम मोदींनी राबवले आहेत. लखपती दीदीपासून ते ड्रोन दीदी पर्यंतच्या अनेक योजना मोदींनी आणल्या. गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी यांना काम करताना पाहण्याचं मला भाग्य मिळालं. आज भारतातील महिला जगात आपला नावलौकीक मिळवत आहेत. भारताच्या नारीशक्तीचं वैभव जगाने पाहिलं आहे, असं स्मृती ईराणी यांनी सांगितलं.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट कालपासून सुरू झाली आहे. आज या समीटचा दुसरा दिवस आहे. उद्या 27 फेब्रुवारीपर्यंत ही समीट चालणार आहे. कॉन्क्लेव्हची थीम India: Poised For The Next Big Leap ठेवण्यात आली आहे. आजच्या कार्यक्रमात स्मृती ईराणी यांनी भाग घेतला. त्यांच्याशिवाय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, बॉलिवूड स्टार आयुष्यमान खुराना आणि कंगना राणावत सामील होणार आहेत. आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत.