नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : राजधानी दिल्लीत व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट सुरू झाली आहे. टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला देशविदेशातील दिग्गज सहभागी झाले आहेत. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं हे दुसरं पर्व आहे. या दुसऱ्या पर्वालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात अनेक विषयावर मंथन होणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रानंतर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी रवीना टंडनला नक्षत्र सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रवीना टंडनला नक्षत्र सन्मान पुरस्कार देण्यात आला. यावेळी रवीना टंडनने आनंद व्यक्त केला. तसेच टीव्ही9 नेटवर्कचे आभारही मानले. रवीना टंडने गेल्या अनेक दशकापासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. हाच धागा पकडून रवीनाने महत्त्वाचं विधान केलं. मी 90च्या दशकातच लोकप्रिय नव्हते. आपण आजही तितकेच प्रासंगिक आहोत, जितके पूर्वी होतो. तसेच आपण नेहमीच इथे असणार आहोत, असं रवीना म्हणाली.
मी बॉलिवूडमध्ये काम करत असताना माझ्या कामाचं जेव्हाही कौतुक व्हायचं तेव्हा चांगलं वाटायचं. डेब्यू पुरस्कार असो की हा पुरस्कार, मला नेहमीच आनंद वाटत आला आहे. एव्हर शायनिंग स्टारचा पुरस्कारही मला प्रचंड आवडला, असंही रवीना म्हणाली.
अभिनेत्री रवीना टंडन ही आपल्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. 1991मध्ये पत्थर के फूल या सिनेमातून तिने आपल्या फिल्मी प्रवासाला सुरुवात केली. या सिनेमात तिचा हिरो होता सलमान खान. पहिल्याच सिनेमासाठी रवीनाला फिल्मफेयरचा न्यू फेस ऑफ दी ईयर पुरस्कार मिळाला. रवीनाने तिच्या करीअरमध्ये मोहरा, अंदाज अपना अपना, लाडला, दिलवाले, जिद्दी, दिवाना मस्ताना, दुल्हे राजा आणि शूल सारखे दमदार सिनेमे केले. गोविंदा आणि रवीनाची जोडी नेहमीच पसंत केली गेली.
रवीनाने एकेकाळी मोठा पडदा गाजवला. पण त्यानंतर तिने काळाची पावले ओळखून ओटीटीतही दमदार पाऊल ठेवलं. अरन्यक आणि कर्मा कॉलिंग सारख्या वेब सीरिज करून हे क्षेत्रही आपल्या हाताबाहेरचं नाही हे तिने दाखवून दिलं होतं. तिच्या या दोन्ही वेब सीरिजची चांगलीच चर्चा झाली होती.