नवी दिल्ली | 24 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अब की बार 400 पारचा नारा दिला आहे. भाजपने हा नारा दि ल्याने त्याबाबतचं कुतुहूल वाढलं आहे. भाजप अब के बार 400 पार कसे करणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षापूर्वी जी क्रेझ होती, तीच क्रेझ आताही आहे काय? शहरात आणि ग्रामीण भागात भाजपची लोकप्रियता असूनही कायम आहे काय? भाजप कशाच्या अधारावर 400 पारचा दावा करत आहे? हे आणि असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे भाजपच्या केंद्रीय मंत्र्याकडून मिळणार आहे. टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. त्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निवडणूक रणनीतीकार भूपेंद्र यादव या मुद्द्यावर भाष्य करणार आहेत. ग्लोबल समीटमधील सत्ता संमेलनच्या इव्हेंटमध्ये भाग घेतील.
न्यूज नेटवर्क टीव्ही9 ने व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन केलं आहे. या मेगा इव्हेंटमध्ये राजकीय, आर्थिक, सिनेमा, खेळ आणि इतर क्षेत्रातील नामवंत हजेरी लावणार आहेत. उद्या 25 फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे. या कॉन्क्लेव्हच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी सत्ता संमेलन होणार आहे. त्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव भाग घेणार असून भाजपच्या मिशन 400 वर भाष्य करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अब की बार 400 पारचा नारा दिला आहे. येत्या निवडणुकीत भाजपला 370 हून अधिक जागा मिळतील तर एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. त्यामुळे पक्षाला अधिकाधिक जागा मिळण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भूपेंद्र यादव हे भाजपच्या रणनीतीकारांपैकी एक आहेत. त्यामुळे यादव हे भाजप 400 चा आकडा कसा पार करणार यावर मत मांडणार आहेत.
अब की बार 400 पारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप तळागाळापर्यंत कसं काम करत आहे? ज्या ठिकाणी पक्षाचं बळ कमी आहे, तिथे कमळ फुलवण्यासाठी भाजप काय करणार आहे याची माहिती यादव देणार आहेत. त्याशिवाय दक्षिण भारतात भाजप मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत आहे, तिथे पक्ष काय रणनीती अवलंबणार आहे याची माहितीही भूपेंद्र यादव देणार असल्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सभांमधून 400 पार वर भाष्य केलं आहे. एका रॅलीत मोदी म्हणाले होते की, विरोधी पक्ष मोदींना जितक्या शिव्या देईल, तेवढाच आमचा 400 पारचा संकल्प पूर्ण होईल. भूपेंद्र यादव हे राजस्थानचे आहेत. 2013मधील राजस्थानच्या विधानसभा निवडणुका, 2014ची झारखंडची निवडणूक आणि नंतर 2017मधील गुजरात आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील विजयाचं श्रेय भूपेंद्र यादव यांना दिलं जातं. 2020मध्ये बिहारमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली. त्यात यादव यांचं योगदान मोठं होतं. त्यातनंतर अनेक निवडणुकीतील भाजपच्या विजयाचे ते शिल्पकार राहिले आहेत.
भाजपने काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी स्पेशल टीम-8 बनवली आहे. भूपेंद्र यादव यांना या टीममध्ये घेण्यात आलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समित्या तयार करण्यासाठी पक्षाने आठ नेत्यांची निवड केली आहे. भाजपने विरोधी पक्षाच्या एकजुटीला खिंडार पाडण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यासाठी एक समितीही बनवली आहे. या खास समितीत दोन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचा समावेश आहे.