शेख हसीना यांना भारताने दिला आश्रय, बांगलादेशमधील अस्थिरतेवर भारताची भूमिका काय?

| Updated on: Aug 05, 2024 | 8:02 PM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांनी पुढचा निर्णय घेतलेला नाही. त्यांनी भारताकडून अजून कोणत्याही प्रकारची मदत मागितलेली नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत मागितली तर भारत सरकार त्यावर विचार करेल.

शेख हसीना यांना भारताने दिला आश्रय, बांगलादेशमधील अस्थिरतेवर भारताची भूमिका काय?
बांगलादेशमधील अस्थिरतेवर भारताची भूमिका काय?
Follow us on

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आपल्याच देशातून पलायन केलं आहे. हसीना शेख यांच्या पंतप्रधान निवासात आज काही आंदोलकांनी प्रवेश करत तोडफोड केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे हसीना शेख यांना अखेर आज देश सोडावा लागला आहे. शेख हसीना आपल्या विशेष हेलिकॉप्टरने भारताच्या दिशेला रवाना झाल्या. शेख हसीना यांच्यावर ओढावलेल्या या संकट काळात भारताने त्याने आश्रय दिला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर बांगलादेश येथून निघाल्यानंतर भारताच्या उत्तर प्रदेशमधील हिंडन एअरबसवर लँड झालं. त्या भारतात फार वेळ थांबणार नाहीत. त्या लवकरच युरोपच्या दिशेला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शेख हसीना या लंडनला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांगलादेशमधील घडामोडींवर भारताची भूमिका काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बांगलादेशमधील घडामोडींनंतर देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. संसद भवन येथील पीएम कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली आहे. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल शेख हसीना यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. हसीना शेख यांनी भारताकडे अजून कोणतीही मदत मागितलेली नाही. त्यांनी भारताकडे राजकीय शरण मागितलेलं नाही. त्यामुळे शेख हसीना या हिंडन एयरबेसवरतीच थांबल्या आहेत.

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये विशेष अलर्ट जारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांनी पुढचा निर्णय घेतलेला नाही. त्यांनी भारताकडून अजून कोणत्याही प्रकारची मदत मागितलेली नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत मागितली तर भारत सरकार त्यावर विचार करेल. बांगलादेशमधील परिस्थितीवर भारत अलर्ट मोडवर आहे. विशेष म्हणजे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बांगलादेशात नेमकं काय-काय घडलं?

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “ही अत्यंत दुर्देवी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बांगलादेशच्या लोकशाहीच्या भवितव्यासाठी, बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी तसेच भारताच्या दृष्टीकोनातूनही नकारात्मक आहे. बांगलादेशात जी अस्थितरता निर्माण झाली आहे ती केवळ आरक्षणामुळे निर्माण झालेली नाही. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरील मार्ग हा मागच्या महिन्यातच काढला गेला होता. पण शेख हसीना यांनी चौथ्यांदा पंतप्रधान पदाची धुरा सांभाळल्यापासून सातत्याने त्यांच्याविरोधात अशाप्रकारचे निदर्शने होत आहेत. ही निदर्शने राजकीय हेतून प्रेरित असली तसेच त्या पाठिमागे बांगलादेश नॅशनल पक्ष जरी असला तरी त्याचा वणवा नियंत्रणात आणण्यात शेख हसीना या अयशस्वी ठरल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

“बांगलादेशात जानेवारी महिन्यात भारताने बांगलादेश सोडावा, असे नारे देण्यात आले होते. त्यानंतर जुलै महिन्यावरुन तिथे वातावरण तापलं होतं. काल रविवारी 300 जणांचा मृत्यू झाला. हा खरंतर सरकारी आकडा आहे. दीड हजार नागरीक मारले गेल्याचा अंदाज आहे. जवळपास 1 कोटी नागरीक रस्त्यावर होते. देशाची परिस्थिती हाताळण्यात शेख हसीना यांना अपयश आलं”, असं मत शैलेंद्र देवळाणकर यांनी मांडलं.

“बांगलादेशच्या लष्कराची भूमिका हा साशंकता निर्माण करणारी आहे. लष्कर कालपर्यंत शेख हसीना यांच्या पाठिशी होती. यानंतर काल लष्कराने आंदोलकांवर गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे या आंदोलनाचा वणवा सर्वत्र पसरला. त्यामुळे आंदोलन जास्त भडकलं. अखेर शेख हसीना यांना देश सोडावा लागला”, असं शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितलं.