काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीकडून कितीही दावे केले जात असले, तरी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेवर येणार असल्याच स्पष्ट आहे. काल भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडली. यात NDA चे सर्व नेते सहभागी झाले होते. ज्या दोन नेत्यांची सर्वाधिक चर्चा आहे ते नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे सुद्धा बैठीकाला उपस्थित होते. बिहारमधून येणाऱ्या नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे 12 तर टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडे 16 खासदार आहेत. भाजपाच्या केंद्रातील सरकारचे हे दोन पक्ष प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांच्या भूमिकेवर भविष्यातही बरच काही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे नितीश बाबू आणि चंद्राबाबू यांची उपस्थिती महत्त्वाची होती.
येत्या दोन-तीन दिवसात नवीन सरकार स्थापन होऊ शकतं. परंपरेप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारच्या शपथविधीपूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी मोदींकडे सोपवली आहे. नवीन सरकार भाजपाप्रणीत एनडीएचच येणार आहे. काल एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची निवड झाली. नव्या सरकारमध्ये भाजपाला पूर्वीसारखी एकाधिकारशाही चालवता येणार नाही. कारण त्यांच्याकडे स्वबळावर पूर्ण बहुमत नाहीय. त्यांचं सरकार इतर पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भाजपाला यावेळी महत्त्वाची खाती सोडावी लागू शकतात. याआधी मित्रपक्षांची भाजपाने एक ते दोन मंत्रिपदांवर बोळवण केली आहे.
NDA मध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. नव्या सरकारमध्ये भाजपला पाच मंत्रिपद गमवावी लागणार अशी माहिती आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तब्बल पाच मंत्री पद दिली जाणार आहेत. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा भाजपाचा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती आहे. नितीश कुमार यांच्या 12 जागांसाठी 2 कॅबिनेट मंत्रीपद तर चंद्राबाबू नायडू यांच्या 16 जागांसाठी 3 कॅबिनेट मंत्री पद दिली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे.