why lawrence bishnoi change name: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नाईचे नाव समोर आले आहे. त्यानंतर त्याची चर्चा देशभर सुरु झाली आहे. कारागृहात असलेल्या या गँगस्टरसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली. त्याच्या परिवाराकडून ही माहिती दिली गेली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा परिवार त्याच्यावर महिन्याला 35 ते 40 लाख रुपये खर्च करतो, अशी माहिती त्याचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई यांनी दिली. 50 वर्षीय रमेश बिश्नोई यांनी लॉरेन्स बिश्नोईसंदर्भात अनेक राज उघड केले.
रमेश बिश्नोई यांनी सांगितले की, लॉरेन्स हा पंजाब विद्यापीठातील विधी शाखेचा पदवीधर आहे. पुढे जाऊन तो गँगस्टर होईल, असे स्वप्नही कोणाला पडले नाही. लॉरेन्सचे वडील हरियाणा पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. त्यांच्याकडे गावात 110 एकर जमीनसुद्धा होती. त्याला नेहमी महाग कपडे आणि शूज वापरण्याची हौस होती. तो आता कारागृहात असला तरी त्याच्या देखभालीसाठी परिवाराकडून मोठा खर्च होतो. वर्षाला जवळपास 35 ते 40 लाख रुपये त्याच्यावर खर्च केले जात आहे.
लॉरेन्स बिश्नोईचा जन्म पंजाबमधील फिरोजपूरमध्ये झाला. त्याचे खरे नाव बलकरन बरार होते. शाळेत असताना त्याने आपले नाव बदलून लॉरेन्स केले. त्याची काकू त्याला सांगत होती, तुझ्यावर लॉरेन्स नाव अधिक चांगले वाटते. त्यामुळे त्याने लॉरेन्स बिश्नोई नाव घेतले. आता हे नाव हायप्रोफाईल खटल्यामध्ये जोडले गेले आहे.
कॅनडाच्या पोलिसांनाही लॉरेन्स बिश्नोई हवा आहे. त्या ठिकाणी सुरु असलेल्या कारवायांमध्ये लॉरेन्स टोळीचा संबंध असल्याचा दावा कॅनडाचा आहे. मात्र, भारत सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यापूर्वी मे 2022 मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नावही समोर आले होते. बिष्णोई टोळीने मूसवाला यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या तो गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती कारागृहात आहे. गुजरात एटीएस आणि राष्ट्रीय तपास संस्था त्याची चौकशी करत आहे.