बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आता कुठेत? मोठी माहिती आली समोर

| Updated on: Oct 24, 2024 | 8:21 PM

बांगलादेशातील हिंसक निदर्शनांनंतर भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आता दिल्लीत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्या दोन महिन्यांपासून नवी दिल्लीतील लुटियन्स झोनमधील एका बंगल्यात राहत आहेत. त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता लक्षात घेऊन भारत सरकारने विशेष व्यवस्था केली आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आता कुठेत? मोठी माहिती आली समोर
Follow us on

नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याने देश सोडावा लागला होता. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी त्यांनी ढाका येथील निवासस्थान सोडलं आणि भारताकडे आश्रय मागितला होता. भारताने देखील त्यांना मदत केली. सरकारविरोधी आंदोलकांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली होती. इतकंच नाही तर घरातील वस्तूही लुटून नेल्या होत्या. जीव वाचवण्यासाठी शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या. इतर कोणत्याही देशांनी त्यांना मदत केली नाही. अमेरिका आणि यूकेने त्यांचा व्हिजा नाकारला होता.

केंद्र सरकारने त्यांना दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर राहण्याची सोय केली होती. बांगलादेशकडून शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी होत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान अद्याप देशात परतण्याच्या मनस्थितीत नाहीत. आता शेख हसीना यांना दिल्लीतील लुटियन झोनमधील बंगल्यात शिफ्ट केल्याची माहिती समोर येत आहे.

‘द प्रिंट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेख हसीना यांना आता दिल्लीत स्थलांतरित केले गेले आहे. त्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या राहण्याची आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था केली आहे. लुटियन झोनमधील एका बंगल्यात त्या राहत आहेत. हा बंगला केंद्रीय मंत्री, वरिष्ठ खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला जातो त्यापैकी एक आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांची सुरक्षा आणि गोपनीयता लक्षात घेऊन त्यांच्या बंगल्याबद्दल फारसा खुलासा करण्यात आलेला नाही.

रिपोर्टनुसार, शेख हसीना यांच्यासाठी त्यांच्या घराच्या जवळ कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान येथे 24 तास नजर ठेवून आहेत. मात्र ते साध्या वेशात तैनात असल्याची माहिती आहे. योग्य सुरक्षा प्रोटोकॉलसह, शेख हसीना लोधी गार्डनमध्ये अधूनमधून फिरायला देखील जातात. सुमारे दोन महिन्यांपासून त्या या परिसरात राहत आहेत. त्यांच्या राहण्याची सर्व व्यवस्था सरकारने केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना आणि त्यांच्या सोबत काही जण 5 ऑगस्टच्या रात्री उशिरा बांगलादेश हवाई दलाच्या विमानातून हिंडन एअरबेसवर पोहोचले होते. मात्र, दोनच दिवसांत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

बांगलादेश सोडून हिंडन एअरबेसवर पोहोचल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी शेख हसीना यांची भेट घेतली होती. सूत्रांनी सांगितले की, शेख हसीना हिंडन एअरबेसवर जास्त काळ थांबू शकत नाहीत. कारण तेथे पुरशी व्यवस्था नाही,  त्यामुळे काही दिवसांतच त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. आता त्यांची दिल्लीच्या सुरक्षित परिसरात राहण्याची व्यवस्था करण्यात आलीये.