चंदीगड : पंजाबच्या मोगा पोलिसांनी फरार अमृपाल सिंग याला अटक केली आहे. 36 दिवसानंतर त्याला अटक करण्यात यश मिळाले आहे. या 36 दिवसात अमृतपालने वेषांतर केलं होतं. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती येत नव्हता. शिवाय त्याचं लेडी नेटवर्क जबरदस्त होतं. या महिलाच त्याला मदत करत होत्या. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, त्याला आज सकाळी एका गुरुद्वारातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. स्वत:ची भिंडरावालेशी तुलना करणारा… खालिस्तानचं समर्थन करणारा आणि दुबईहून पंजाबात येऊन नागरिकांना भडकवणारा अमृतपाल अत्यंत रंगेल होता.
अमृतपाल हा अवघा 30 वर्षाचा आहे. वारिस दे पंजाब या संघटनेचा तो प्रमुख आहे. त्याला जनरल सिंह भिंडरावाले-2.0 म्हणूनही ओळखलं जातं. भिंडरावाले यांनी ऐंशीच्या दशकात स्वतंत्र खालिस्तानची मागणी केली होती. त्याने संपूर्ण पंजाबात दहशत निर्माण केली होती. अमृतपाल सिंग त्याच्यासारखच राहण्याचा प्रयत्न करतो. डोक्यावर पगडी बांधतो आणि जमावाला उकसवणारे विधाने करत असतो.
2021मध्ये त्याने वारिस पंजाब दे या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा पहिला वर्धापन दिन त्याने रोडे गावात केला होता. हे गाव भिंडरावाले याचं आहे. भिंडरावालेप्रमाणेच तोही निळी गोल पगडी घालतो. आपल्या सफेद कुर्त्यामध्ये छोटी कृपाण ठेवतो आणि भडकाऊ भाषण देतो. त्यामुळे तो तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे.
अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्धू यांनी वारिस पंजाब दे या संघटनेची स्थापना केली होती. पण 15 फेब्रुवारी 2022मध्ये दीप सिद्धू यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर काही दिवसाने अमृतपाल हा दुबईहून भारतात आला आणि त्याने संघटनेची जबाबदारी स्वीकारली. त्याने वारिस पंजाब देचं संकेतस्थळ तयार केलं आणि लोकांना आपल्याशी जोडण्यास सुरुवात केली.
अमृतपाल 2012मध्ये दुबईत राहायला गेला होता. तिथे त्याने ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय सांभाळला. त्याचं पंजाबातील गावात शिक्षण घेतलं. तो फक्त इयत्ता 12 वीपर्यंत शिकलेला आहे. पंजाबातील शिवसेना नेता सुधीर सुरी यांच्या हत्याकांडात अमृतपालचं नाव आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्याला नजर कैदेत ठेवलं होतं.
अमृतपाल हा अमृतसरच्या जल्लूपूर खेडा येथील रहिवासी आहे. 10 फेब्रुवारी रोजी जल्लूपूर खेडा येथे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या किरणदीप कौर यांच्याशी त्याचा विवाह झाला होता. किरणदीपचं कुटुंब मुळचे जालंधरच्या कुलारां गावातील आहे. पण ते इंग्लंडमध्ये स्थायिक आहेत. लग्नानंतर त्याचं आणि किरणदीपचं पटायचं नाही. त्यांचे संबंध सुमधूर नव्हते.
अमृतपालचे पत्नीशी चांगले संबंध नव्हते. पण त्याचे लेडी नेटवर्क जबरदस्त होते. फरार झाल्यानंतर त्याने सर्वात आधी लेडी नेटवर्कचा वापर केला. त्याचा सहकारी पप्पलप्रीत याच्या अनेक महिला मैत्रिणी आहेत. त्यांनीच या दोघांना लपण्यासाठी मदत केल्याचं उघड झालं आहे. पप्पलप्रीत तर हरियाणातील त्याची मैत्रीण बलजीत कौरच्या घरी थांबला होता.
इथे त्याने बलजीत आणि तिच्या भावाचा फोनही वापरला होता. तिच्याच घरात पळून जाण्याची पुढची रणनीतीही तयार केली होती. त्यानंतर तो दिल्लीतील एका मैत्रीणीच्या घरीही आश्रयाला होता. पप्पलप्रीतच्या दहा मैत्रीणी पोलिसांच्या रडारवर होत्या. त्यांचा फोन आणि सोशल मीडिया अकाऊंटवर पोलिसांची नजर होती. त्यात दिल्लीतील तीन महिलांचा समावेश होता. त्यांची पोलिसांनी चौकशीही केली होती.