नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. मोदी समुदायाचा अपमान केल्याच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी दोषी ठरले होते. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज लोकसभेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामुळे राहुल गांधी यांना शिक्षा तर झालीच पण खासदारकीही गमवावी लागली आहे. ज्यांच्यामुळे राहुल गांधींना संसदेतूनच बाद व्हावं लागलं ते पूर्णेश मोदी कोण आहेत? याचा घेतलेला हा आढावा.
पूर्णेश मोदी हे गुजरातमधील आमदार आहेत. ते भाजपचे सदस्य आहेत. ते गुजरातचे आहेत. ते गुजरातचे माजी मंत्रीही आहेत. पूर्णेश मोदी हे 54 वर्षाचे आहेत. त्यांचं पूर्ण नाव पूर्णेश कुमार ईश्वरलाल मोदी असं आहे. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1965 रोजी झाला होता. ते बीकॉम आहेत. त्यांच्याकडे साऊथ गुजरातमधील सूरत येथील सर चौवासी लॉ कॉलेजची एलएलबीची डिग्री आहे. त्यांनी 1992मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतील होती.
2017च्या निवडणुकीत त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून त्यांचा पेशा दाखवला होता. त्यांची पत्नी गृहिणी असून उद्योगही सांभाळते. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एक कोटीहून अधिक संपत्ती आहे. त्यात सुमारे 13 लाख रुपयांच्या सोने आणि चांदीचा समावेश आहे. सध्या ते 167-सूरत (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. गुजरात सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेलं आहे. परिवहन, नगरविकास, पर्यटन आणि तीर्थ यात्रा विकास विभागाची जबाबदारी सांभाळलेली आहे.
राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी कर्नाटकाच्या कोलारमध्ये प्रचार सभा घेतली होती. या प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारं विधान केलं होतं. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानाला पूर्णेश मोदी यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. या प्रकरणी त्यांनी कोर्टात धाव घेऊन राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी तब्बल चार वर्ष सुनावणी सुरू होती. शुक्रवारी ही सुनावणी संपली. त्यानंतर निर्णय राखून ठेवला गेला. काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज संसदेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली.