अयोध्या : 22 जानेवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिरात आज सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. राम जन्मभूमीत विराजमान भगवान राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तींना आता खादी सिल्कचे वस्त्र परिधान करण्यात आले आहेत. हे नवीन वस्त्र खादी आणि ग्रामोद्योग बोर्डाकडून डिझायनर मनीष त्रिपाठी यांनी तयार केले आहेत. मनीष यांनी रामललाचे वस्त्र उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांच्याकडे सोपवले. रामललाचे पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की प्रभू श्रीरामाचे वस्त्र अगदी त्याच मापाने बनवण्यात आले आहेत, जसे अयोध्येमधील टेलर बनवायचे. मनीष त्रिपाठी यांच्या डिझायनिंगची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
ड्रेस डिझायनर मनीष त्रिपाठी हे अयोध्येच्या शेजारी असलेल्या जनपद आंबेडकरनगर इथले राहणारे आहेत. फॅशन क्षेत्रातील कौशल्यामुळे आणि टेक्सटाइल्स इंडस्ट्रीविषयी असलेल्या ज्ञानामुळे त्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयात सल्लागाप पदही भूषवलं होतं. ते मुंबईतही प्रसिद्ध ड्रेस डिझायनर आहेत. मनीष यांनी नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन अँड टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली इथून शिक्षण पूर्ण केलं. ते मुक्तीर फॅशन इंडिया लिमिटेड नावाच्या कंपनीचे संस्थापक होते. सध्या ते ‘डिझाइन मी’ या कंपनीचे मालक आहेत.
मनीष त्रिपाठी यांनी बिझनेस, क्रीडा, राजकारण, बॉलिवूड या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसाठी कपडे डिझाइन केले आहेत. ‘कान्स फेस्टिव्हल’साठीही त्यांनी कपडे डिझाइन केले आहेत. सध्या ते भारतातील हातमाग आणि हस्तकला उद्योगांच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या अधिकाधिक प्रचारासाठी विणकर समुदायासोबत मिळून काम करत आहेत. रामललाचे वस्त्र बनवण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वत:ला अत्यंत सौभाग्यवान समजत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वसंत पंचमीनिमित्त रामललाच्या मूर्तीला हे वस्त्र परिधान केले जातील. खादी कपड्यापासून त्यांनी हे वस्त्र बनवले आहेत.
अयोध्येतील राम मंदिरात आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. कार्यक्रमासाठी निवडक लोकांनाच प्रवेश असल्याने जगभरातील कोट्यवधी लोकांनी दूरचित्रवाणी आणि ऑनलाइन माध्यमातून प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवला. देशभरातील विविध मंदिरांमध्येही आरत्या, घंटानाद अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.