कोण आहेत झारखंडचे होणारे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन?

| Updated on: Jan 31, 2024 | 8:43 PM

Jharkhand new cm : झारखंडच्या नव्या मुख्यमंत्रीपदासाठी चंपाई सोरेन यांचं नाव आघाडीवर आहे. कारण हेमंत सोरेन यांनी ईडीकडून अटक झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांनी चंपाई सोरेन यांना आपला पाठिंबा दिला आहे.

कोण आहेत झारखंडचे होणारे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन?
Follow us on

नवी दिल्ली : झारखंडच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होऊ शकते. कारण ईडीकडून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. सीएम हेमंत सोरेन यांना ईडीच्या पथकाने सात तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. त्यामुळे आता झारखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सत्ताधारी पक्षातील आमदारांनी चंपाई सोरेन यांना पाठिंबा देणारे पत्र दिले आहे. त्यामुळे आता चंपाई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.

हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर राज्यात सगळीकडे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भाजप कार्यालयासह विविध महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवली आहे. ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांची 7 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

हेमंत सोरेन यांच्या उत्तरांवर ईडीचे अधिकारी समाधानी नाहीत. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांना जवळपास ४० प्रश्न विचारले होते. पण त्यांच्याकडून यावर कोणतीही समाधान करणारी उत्तरे न मिळाल्याने त्यांना ईडीने अटक केली. झारखंडच्या अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

कोण आहेत चंपाई सोरेन?

बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर शिबू सोरेन यांच्यासोबत चंपाई सोरेन देखील या चळवळीचा भाग झाले. चंपाई सोरेन यांनी सरायकेला मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार बनून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले.

भाजप सरकारमध्ये मंत्री होते

भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या सरकारमध्ये JMM नेते चंपाई सोरेन हे कॅबिनेट मंत्री राहिले होते. त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपाई सोरेन यांना अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आले.

हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्री

हेमंत सोरेन 2019 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर चंपाई सोरेन यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले आहे. चंपाई सोरेन हे झामुमोचे उपाध्यक्ष ही आहेत.