भाजपच्या 195 नावांच्या यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार कोण?

| Updated on: Mar 02, 2024 | 9:25 PM

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे, भाजपने पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार आहे. 195 च्या यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार अब्दुल सलाम कोण आहेत? त्यांच्यावर भाजपचा इतका विश्वास का जाणून घ्या.

भाजपच्या 195 नावांच्या यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार कोण?
Follow us on

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केलीये. या यादीत अनेक दिग्गज नेत्यांची नावे आहेत. अनेकांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तर काही जणांचे तिकीट कापण्यात आले आहे. काही नव्या युवा उमेदवारांना देखील संधी मिळाली आहे. भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत एकमेव मुस्लीम उमेदवार अब्दुल सलाम यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. त्यांना भाजपने केरळमधील मलप्पुरममधून तिकीट दिले आहे. भाजपने केरळमधून 12 उमेदवारांना तिकीट दिले असून अब्दुल सलाम हे एकमेव मुस्लीम उमेदवाराचे नाव आहे.

केरळमध्ये भाजपने मुस्लीम उमेदवार अब्दुल सलाम यांच्यावर विश्वास दाखवला आहे. ते केरळमधील धर्मनिरपेक्ष चेहरा आहेत. त्यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा होती. भाजपची दुसरी यादी येणं बाकी आहे. त्यामुळे भाजप अजून किती मुस्लीम उमेदवारांना तिकीट देते याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. केरळ सारख्या राज्यातून भाजपला अजून हवं तसं यश मिळालेले नाही. आता अब्दुल सलाम यांना तिकीट दिल्याने भाजपला काही फायदा होतो का हे पाहावे लागेल.

कोण आहेत अब्दुल सलाम

डॉ. अब्दुल सलाम हे तिरूरचे आहेत. अब्दुल सलाम हे कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू होते. 2011 ते 2015 पर्यंत त्यांनी कुलगुरू म्हणून काम केले आहे. काँग्रेसचे नियंत्रण असलेल्या यूडीएफने त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. My Neta.info नुसार, त्याची एकूण संपत्ती 6 कोटी 47 लाख रुपये आहे आणि त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

भाजपकडून अजून पूर्ण यादी जाहीर झालेले नाही. त्यामुळे आणखी काही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी दिली जाऊ शकते. अशी चर्चा आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही अल्पसंख्याक उमेदवार उभे केले जाऊ शकतात. यूपीमध्ये भाजपने मुस्लीम बहुल संभल मतदारसंघातून परमेश्वर लाल सैनी यांना उमेदवारी दिली आहे. तर अमरोहामधून कंवर सिंग तन्वर आणि रामपूरमधून घनश्याम लोधी यांना उमेदवारी दिली आहे.

मुस्लीम मतदारांचे वर्चस्व असलेल्या रामपूरमध्ये घनश्याम लोधी यांनी गेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता आणि २०१४ च्या निवडणुकीत संभलची जागा भाजपने जिंकली होती.