अहमदाबाद: विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वातच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील असं भाजप वारंवार सांगत होता. परंतु, विजय रुपाणी यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर नितीन पटेल यांनाही उपमुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्वांना धक्का देत भाजपने अवघ्या 27 दिवसात आपला निर्णय फिरवला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपने हा निर्णय का फिरवला? रुपाणी यांना हटवण्यामागचं नेमकं कारण काय? यावर टाकलेला हा प्रकाश. (Why BJP decided to remove Vijay Rupani as Gujarat CM after assurance in 27th day?)
16 ऑगस्ट रोजी गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी मोठं विधान केलं होतं. भाजप येणारी निवडणूक विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांच्या नेतृत्वातच लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. रुपाणी यांच्या नेतृत्वाबाबत गुजरातमध्ये नाराजी होती. त्यामुळे रुपाणी राहणार की जाणार अशी चर्चा होती. त्यावर पडदा टाकण्यासाठी पाटील यांनी हे विधान केलं होतं. रुपाणी आणि पटेल हे दोन्ही नेते चांगले काम करत आहेत. त्यामुळे राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातचं मुख्यमंत्रीपद सोडलं आणि दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले. तेव्हापासून गुजरातमध्ये नेतृत्वाची वाणवा निर्माण झाली आहे. भाजपला अजूनही गुजरातवर छाप पाडेल असा नेता मिळू शकला नाही. त्यामुळेच आधी आनंदीबेन पटेल आणि नंतर विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलं आहे. आनंदीबेन पटेल यांच्या कामावर गुजरातची जनता खूश नव्हती. लोकांमध्ये आनंदीबेन यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. त्यामुळे रुपाणींना आणलं गेलं. रुपाणी यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष पूर्ण केलेही. पण त्यांचीही राज्यावर छाप पडू शकली नाही, त्यामुळे त्यांनाही खुर्ची सोडावी लागली.
2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळविताना नाकीनऊ आले होते. या निवडणुकीचं नेतृत्व रुपाणी यांच्याकडे होते. तर आता कोरोनाच्या संकटात परिस्थिती हाताळण्यात रुपाणींना अपयश आलं. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल असंतोष होता. तसेच पटेल समुदायही भाजपवर नाराज होता. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि गुजरातमधील निवडणुकीची समीकरणे साधण्यासाठी रुपाणी यांना हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजातून आले आहेत. ते पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. त्यांना मंत्रिपदाचा अनुभवही नाही. नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केलेल्या भूपेंद्र पटेल यांची इमेज मिस्टर क्लिनची आहे. त्यामुळेच पटेल यांना संधी देऊन पाटीदार समाजाला आपल्याकडे वळती करण्यासाठीच भाजपने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
नितीन पटेल हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. सरकारमध्ये नितीन पटेल यांचं राजकीय वजन, वर्चस्व आणि हस्तक्षेप प्रचंड वाढला होता. शिवाय त्यांची मुख्यमंत्रीपदाची आस लपून राहिली नव्हती. आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. आताही रुपाणी यांनी पद सोडल्यानंतर त्यांच्याच नावाची चर्चा होती. मात्र, हायकमांडने त्यांना बाजूला सारत भूपेंद्र पटेल सारख्या नवख्या आमदाराला संधी दिली आहे. नितीन पटेल यांच्यासाठी ही समज आणि सूचक इशारा असल्याचंही सांगितलं जात आहे. (Why BJP decided to remove Vijay Rupani as Gujarat CM after assurance in 27th day?)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 13 September 2021 https://t.co/rcDScOKSPv #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021
संबंधित बातम्या:
पहिल्यांदाच आमदार झाले आणि थेट मुख्यमंत्रीच, कोण आहेत भूपेंद्र पटेल?
अमित शहा आले, बैठका घेतल्या आणि रुपाणी गेले; ‘त्या’ रात्री काय घडलं?, वाचा सविस्तर
(Why BJP decided to remove Vijay Rupani as Gujarat CM after assurance in 27th day?)