पटणा- संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे (Bihar)मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar)यांनी राजीनामा दिला आहे. संयुक्त जनता दलाची असलेली भाजपाची (BJP) युती तुटल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. आता महाआघाडीच्या माध्यमातून आता नितीश कुमार पुन्हा सत्ता स्थापन करणार आहेत. आता भाजपाऐवजी, त्यांना राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, डावे आणि अपक्षांचा पाठिंबा असेल. एकूण २४२ आमदारांच्या सभागृहात त्यांना १६४ आमदारांचा पाठिंबा असणार आहे. उपमुख्यमंत्रीपद राजदच्या तेजस्वी यादव यांच्याकडे जाणार आहे. नितीश कुमार आणि भाजपा यांच्यातील तणाव हा काही नवीन नव्हता. गेल्या काही काळापासून दोन्ही पक्षातील संबंध चांगले नसल्याचे दिसत होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही केंद्र सरकारच्या मोठ्या कार्यक्रमांना जाणेही थांबवलेले होते. गेल्या महिनाभऱात त्यांनी भाजपा नेत्यांशीही संवाद तोडला असल्याची माहिती आहे. जेडीयू आणि भाजपात नेमकं काय बिनसलं त्याची महत्त्वाची पाच कारणे जाणून घेूयात.
नितीश कुमार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात बिहारमध्ये समान वाटा हवा होता. बिहारमधून भाजपाने जितक्या भाजपा नेत्यांना मंत्रिपदे दिली, तितकीच मंत्रीपदे जेडीयूला मिळावी, ही नितीशकुमार यांची अपेक्षा होती. दोघांकडेही १६-१६ खासदार होते. २०१९ मध्ये एनडीएचे सरकार आल्यानंतर संयुक्त जनता दलाला केवळ एकच मंत्रीपद देण्यात आल्याने नितीशकुमार नाराज होते. तसेच जेडीयून मंत्रीपद दिलेल्या आरसीपी सिंह यांच्या मदतीने भाजपा जेडीयू फोडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
भाजपाच्या कोट्यातून विधानसभा अध्यक्षपद मिळवलेल्या विजय कुमार सिन्हा यांच्याशी नितीश कुमार यांचे मतभेद होते. त्यांच्याशी नितीश यांचा वादही झाला होता. मार्च २०२२ मध्ये नितीश यांनी विधानसभेत नियम तोडत अध्यक्षांनी बिहार सरकारवर प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप केला होता. तर फेब्रुवारी २०२२ मध्ये अध्यक्ष विजय सिन्हा यांनी सरकारवर टीका केली होती. विजय सिन्हा यांच्या मतदारसंघात कोरोना नियम मोडले म्हणून भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली होती, त्यावरुन हा वाद झाला होता.
अग्निपथ योजनेला विरोध झाला, त्यात बिहारमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर बिहार भाजपा अध्यक्षांनी नितीश सरकारवर टीका केली होती. या सगळ्या आंदोलनात केवळ भाजपाला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. याच कारणावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.
केंद्र सरकार आगामी काळात राज्य आणि देशाच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या विचारात आहे. या वन नेशन वन इलेक्शनला जेडीयूने विरोध केला होता. हे प्रत्यक्षात जमण्यासारखे नाही अशी जेडीयूची भूमिका होती. अग्निपथ योजनेवरही जेडीयूची भूमिका भाजपापेक्षा वेगळी होती. ज्यावेळी यावरुन राज्यात वादंग सुरु झाला होता, त्यावेळी नितीश यांनी मौन बाळगणेच पसंत केले होते. समान नागरी कायद्याच्या भाजपाच्या धोरणालाही जेडीयूचा विरोध आहे.
भाजपाच्या कोट्यातून झालेल्या मंत्र्यांवर नितीश यांचे वर्चस्व असावे अशी नितीश यांची इच्छा होती. या मंत्र्यांच्या निवडीतही नितीश यांचा विचार घ्यावा, अशी त्यांची भूमिका होती. मात्र असे होत नव्हते. अमित शाह मुख्यमंत्र्यांच्या परवानगीविना भाजपाचे मंत्री ठरवीत होते.