पाच वर्षांत 47000 जवानांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती, नोकरी सोडण्याचे कारण तरी काय?

| Updated on: Dec 18, 2023 | 9:14 PM

दहशतवाद, नक्षलवाद, निवडणूक ड्युटी, आपत्ती, व्हीआयपी सुरक्षा आणि इतर आघाड्यांवर हे जवान तैनात असतात. मात्र, असे असूनही त्यांना नागरी दल म्हणून संबोधतात. त्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवले आहे.

पाच वर्षांत 47000 जवानांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती, नोकरी सोडण्याचे कारण तरी काय?
indian Central Paramilitary Forces
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 18 डिसेंबर 2023 : केंद्रीय निमलष्करी दल CRPF, BSF, ITBP, SSB, CISF आणि आसाम रायफल्समध्ये मोठ्या संख्येने स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सैन्य दलाच्या जवानांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्रीय निमलष्करी दलातील 46960 सैनिक आणि अधिकारी यांनी नोकरी सोडली आहे. बीएसएफमधील 21860 जवानांनी आतापर्यंत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. हा आकडा सर्वाधिक आहे. एकीकडे केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. जवानांना भरपूर सुविधा दिल्या जात आहेत तरीही हे जवान स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत यामागील धक्कादायक कारणे पुढे आली आहेत.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नुकतेच राज्यसभेत उत्तर देताना, CRPF आणि आसाम रायफल्स ‘AR’ मधील स्वेच्छा निवृत्ती प्रकरणांची संख्या दरवर्षी बदलते असे सांगितले. सैन्याने स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेली कारणे ही वैयक्तिक आणि घरगुती आहेत. मुले, कौटुंबिक समस्या, स्वत:च्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या समस्या, सामाजिक/कौटुंबिक जबाबदाऱ्या, उत्तम करिअरच्या संधी इत्यादी मुख्य कारणांमुळे जवान स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे ही संख्या कमी करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत असेही सांगितले आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी असाही दावा केला आहे की, या सर्व दलांमध्ये सर्व काही ठीक आहे. कॅडर रिव्ह्यू वेळेवर केला जात आहे. भरपूर सुविधा देण्यात येत आहेत. पदोन्नतीमधील अंतर कमी करण्यासाठी 10, 20 आणि 30 वर्षांच्या नियमित सेवेच्या अंतराने तीन आर्थिक सुधारणा करण्यात येत आहे. मात्र असे असले तरी मोठ्या प्रमाणावर स्वेच्छानिवृत्ती का घेतली जात आहे, असा या दलातील माजी अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे.

बीएसएफचे (BSF) माजी एडीजी संजीव कृष्णा सूद यांनी यामागची कारणे सांगताना अनेक ठिकाणी कामाचा ताण जास्त आहे. जवानांना नीट झोप येत नाही. त्यांच्या समस्या ते कोणाकडे मांडतात तेव्हा त्यांचे ऐकून घेतले जात नाही. काही ठिकाणी बॅरेक आणि इतर सुविधांचा अभाव आहे. अनेकवेळा वरिष्ठांकडून शिवीगाळ होत असल्याने जवान नोकरी सोडतात किंवा आत्महत्या करतात, अशी माहिती दिली.

वेळेवर पदोन्नती किंवा पद न मिळणे हे ही सैनिकांच्या तणावाचे आणखी एक मोठे कारण आहे. कर्तव्यावर असलेल्या दलातील कर्मचाऱ्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, त्याबद्दल सरकार काही बोलत नाही. दहशतवाद, नक्षलवाद, निवडणूक ड्युटी, आपत्ती, व्हीआयपी सुरक्षा आणि इतर आघाड्यांवर हे जवान तैनात असतात. मात्र, असे असूनही त्यांना नागरी दल म्हणून संबोधतात. त्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवले आहे. हवालदार ते त्या पुढील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला बराच वेळ लागतो. या सर्व कारणामुळे जवान नैराश्याखाली येतात असे माजी एडीजी संजीव कृष्णा सूद सांगतात.

पाच वर्षात किती जणांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती?

2019 मध्ये 8927 जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली

2019 मध्ये आसाम रायफल – AR (1307), बीएसएफ – BSF (3847), सीआयएसएफ CISF (540), सीआरपीएफ – CRPF (2481), आयटीबीपी – ITBP (337), एसएसबी – SSB (415) अशा एकूण 8927 जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

2020 मध्ये 6882 जवान स्वेच्छानिवृत्त

2020 मध्ये आसाम रायफल – AR (1018), बीएसएफ – BSF (3310), सीआयएसएफ CISF (469), सीआरपीएफ – CRPF (1320), आयटीबीपी – ITBP (423), एसएसबी – SSB (342) अशा एकूण 6882 जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

2021 मध्ये जवान 10812 स्वेच्छानिवृत्त

2021 मध्ये आसाम रायफल – AR (383), बीएसएफ – BSF (5235), सीआयएसएफ CISF (645), सीआरपीएफ – CRPF (3501), आयटीबीपी – ITBP (652), एसएसबी – SSB (396) अशा एकूण 10812 जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

2022 मध्ये 11169 जवान स्वेच्छानिवृत्त

2022 मध्ये आसाम रायफल – AR (1188), बीएसएफ – BSF (5341), सीआयएसएफ CISF (762), सीआरपीएफ – CRPF (3019), आयटीबीपी – ITBP (545), एसएसबी – SSB (314) अशा एकूण 11169 जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

2023 मध्ये 9170 जवान स्वेच्छानिवृत्त

2023 मध्ये आसाम रायफल – AR (1280), बीएसएफ – BSF (4127), सीआयएसएफ CISF (596), सीआरपीएफ – CRPF (2572), आयटीबीपी – ITBP (324), एसएसबी – SSB (271) अशा एकूण 9170 जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.