भारताच्या दणक्यानंतर मवाळ झालेले मालदीवचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर

| Updated on: Oct 04, 2024 | 8:06 PM

Maldive president india visit : मालदीवचे प्रमुख मोहम्मद मुइज्जू भारत दौऱ्यावर येत आहेत. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे कसे काय झाले. कारण भारतविरोधी भूमिका घेणारे मुइज्जू भारत दौऱ्यावर येण्यामागचं कारण काय आहे. मालदीवला भारताची गरज आता का वाटू लागली आहे. जाणून घ्या सविस्तर

भारताच्या दणक्यानंतर मवाळ झालेले मालदीवचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर
Follow us on

मालदीव आणि भारतातील संबंध गेल्या काही दिवसांपूर्वी बिघडले होते. मालदीवने भारतीय जवानांना मालदीवमधून परत जाण्यास सांगितल्यानंतर भारताने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण मालदीवचे प्रमुख चीनच्या इतक्या प्रेमात पडले होते की, त्यांना भारतासोबत पंगा घेण्यात अधिक रस होता. त्यानंतर भारताने देखील कडक भूमिका घेत मालदीवला त्याचा जागा दाखवून दिली. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर याआधी मालदीवचे नेते हे पहिल्यांदा भारत दौऱ्यावर येत होते. कारण भारत आणि मालदीवचे संबंध चांगले होते. पण मुइज्जू यांनी तसे केले नाही. ते आधी चीनच्या दौऱ्यावर गेले. पण नंतर त्यांना चीनकडून अधिक मदत मिळेल अशी अपेक्षा होती. कारण चीनचे मालदीववर भरपूर कर्ज आहे. मालदीवने आपलं कर्ज इतकं वाढवलं आहे की त्यांना आता चीनचे समर्थन केल्याशिवाय पर्याय नाही. पण मालदीवची अर्थव्यवस्थेत भारतीय लोकांचा वाटा अधिक होता. कारण मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून होती आणि मालदीवमध्ये जाणारे सर्वाधिक पर्यटक भारतीय होते.

आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान त्यांचा हा दौरा असणार आहे. त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. मुइज्जू जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मच्या शपथविधी सोहळ्याला भारतात आले होते. पण यावेळी कोणतीही द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती. आता मालदीव आणि भारत यांच्यात परस्पर सहकार्य आणि व्यापार यावर चर्चा होईल. दोन्ही देशांतील संबंधही अधिक दृढ होण्यावर भर दिला जाईल. कारण मुइज्जू यांना भारतासोबत पंगा घेतल्यास काय होऊ शकते याची कल्पना आधीच आली आहे.

भारत भेटीदरम्यान मालदीवचे प्रमुख मुइज्जू हे मुंबई आणि बंगळुरूला भेट देणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावरून ते भारताला भेट देणार आहेत. त्यामुळे ते राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठकीत सहभागी होतील. मुइज्जू सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता मुइज्जू सरकारची भारताबाबतची भूमिका मवाळ झाली आहे.

मोहम्मद मुइज्जू यांनी गेल्या काही दिवसांमधील केलेल्या वक्तव्यावरुन असे दिसतेय की ते आता भारतासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले होते की, माझा भारताला विरोध नाही. पण परदेशी सैन्य आपल्या धरतीवर नको अशी लोकांची भावना होती म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मुइज्जू सरकारमधील तीन उपमंत्र्यांना निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर सेलिब्रिटींसह भारतीय लोकांनी मालदीववर बहिष्कार टाकला होता, ज्याचा मोठा फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसला. अखेर मालदीवच्या पर्यटनमंत्र्यांना भारतीयांना आवाहन करावे लागले होते की, त्यांच्या देशात भारतीयांचे स्वागत आहे. भारतीय पर्यटकांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेला येऊन हातभार लावावा.