पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाचा फोटो माध्यमांमध्ये आला आहे. तो फोटो पाहून अनेकांना धक्का बसला. फोटोमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या खुर्चीवर बसले आहेत, परंतु पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी त्यांच्यासमोर उभे आहेत. या फोटोची चर्चा चांगली होत आहे. परंतु फक्त नरेंद्र मोदीच नाही तर कोणताही उमेदवार अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर उभा राहतानाच दिसतो. हा एक प्रोटोकॉल आहे. उमेदवार किती मोठा असला तरी निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या सन्मानासाठी उभा राहत नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी हा त्या जिल्ह्यातील मुख्य निवडणूक अधिकारी असतो. कोणताही व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी बसूनच असतात. मग ती व्यक्ती पंतप्रधान असली तरी प्रोटोकॉल बदलत नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी हा ‘कायदेशीर अधिकार’ असतो. त्याला कोणीही आदेश देऊ शकत नाही. त्यासंदर्भात असणाऱ्या प्रोटोकॉलमुळे निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या प्रक्रियेदरम्यान आपल्या खुर्चीवर बसून असतात. ज्या प्रमाणे न्यायालयात कितीही मोठा नेता किंवा मंत्री आला तरी न्यायाधीश आपल्या खुर्चीवरून उठत नाहीत. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी नामांकनाच्या वेळी उभे राहत नाहीत.
जनप्रतिनिधी कायद्यातील कलम 21 आणि 22 नुसार निवडणूक आयोग प्रत्येक एका जागेवर एक निवडणूक निर्णय अधिकारी आणि एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करतो. या व्यक्तीकडे गॅझेटमध्ये नोटीफिकेशन जारी करण्यापासून निकाल येईपर्यंतचे अधिकार असतात. उमेदवाराच्या विजयानंतर त्याला विजयी प्रमाणपत्र हाच अधिकारी देतो. हाच अधिकारी निवडणूक चिन्हांचे वाटप करतो. मतदानासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तयार करण्याची जबाबदारी त्यांची असते. सर्वसाधारणपणे जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी असतात. या सर्व प्रोटोकॉलमुळे पंतप्रधानपदी असलेले नरेंद्र मोदी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापुढे उभे राहिलेले दिसत आहेत.