Congress Politics : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोनिया गांधी यांनी याआधी लोकसभा निवडणूक लढवत लोकसभेत पोहोचल्या होत्या. पण आता त्यांनी रायबरेली ऐवजी राजस्थानचा सुरक्षित पर्याय निवडला आहे. राज्यसभेत प्रवेश करणाऱ्या नेहरू-गांधी कुटुंबातील त्या दुसऱ्या सदस्या आहेत. याआधी त्यांच्या सासू इंदिरा गांधी या देखील राज्यसभेत गेल्या होत्या.
राजस्थानमधून सोनिया गांधी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आता लोकसभेत नेहरु-गांधी घराण्यातून प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी चौथ्या पिढीवर आली आहे. रायबरेलीमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. इंदिरा गांधी यांनी देखील राज्यसभेत जाण्याचा मार्ग निवडला होता. सोनिया गांधी यांनी देखील तोच मार्ग आता निवडला आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले होते. तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी या माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. त्यावेळी त्या राज्यसभेवर आल्या. 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर ते राज्यसभेत असतानाच त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. 1971 आणि 1980 च्या निवडणुकाही पुन्हा त्या रायबरेलीमधून विजयी झाल्या. इंदिरा गांधी यांचा 1977 मध्ये राज नारायण यांच्याकडून पराभव झाला होता.
1977 मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर 1980 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींसह नेहरू-गांधी घराण्याची तिसरी पिढी म्हणून संजय गांधी अमेठीतून लोकसभेवर निवडून आले. संजय गांधी यांच्या निधनानंतर त्यांचे मोठे बंधू राजीव गांधी यांनी अमेठीचा वारसा हाती घेतला. २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना येथून पराभवाचा सामना करावा लागला होता. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत पुन्हा एकदा ते अमेठीतून निवडणूक लढवू शकतात.
सोनिया गांधी 1999 मध्ये अमेठीमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या रायबरेलीमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2019 मध्येच सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळेच त्यांनी राज्यसभेचा मार्ग निवडला आहे.