कोरोनाने कहर केल्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचा KP.1 आणि KP.2 हा नवीन प्रकार आता वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे. सरकार यावर लक्ष ठेवून आहे. या प्रकाराच्या लागणमुळे अजून गंभीर आजार किंवा मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याची पुष्टी झालेली नाही.
दिल्ली एम्सच्या कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर सांगतात की, कोरोना व्हायरसचे उत्परिवर्तन होत राहतात. पुढे ही नवनवीन रूपे येत राहतील. प्रकरणांमध्ये चढ-उतार होतील. पुढील 50 वर्षांपर्यंतही असे होऊ शकते. संसर्ग होण्याची तीव्रता किंवा मृत्यू दर वाढतोय की नाही यावर लक्ष ठेवावे लागेल. याची लागण झालेल्या लोकांना सामान्य सर्दी आहे. त्यापेक्षा कोणतेही गंभीर लक्षण दिसत नाहीत. त्यामुळे घाबरण्याची किंवा रणनीती बदलण्याची गरज नाही.
केवळ भारतातच नाही तर जगातील विविध देशांमध्येही कोरोनाचा रुग्ण वाढत आहे. हा नवीन प्रकार अनेक देशात पसरतो आहे. भारतात KP.1 आणि KP.2 ची 300 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, KP.1 आणि KP.2 हे Omicron च्या JN.1 उप-वंशातील उत्परिवर्तनामुळे अस्तित्वात आले आहेत.
या प्रकारामुळे प्रकरणे वेगाने वाढू शकतात. परंतु, आत्तापर्यंत या दोन नवीन उत्परिवर्तनांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या इतकी नाही की त्यामुळे चिंता वाढेल. यामुळे मृत्यूदरात ही कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. या प्रकारामुळे इन्फेक्शन होत आहे पण त्यात कोणतीही तीव्रता नाही. कोरोनाच्या या नवीन स्वरूपामुळे आणि प्रकारामुळे नक्कीच चिंता वाढली आहे, परंतु आतापर्यंत त्याचे वर्तन असे नाही की तो एक समस्या बनेल. पण तरीही नजर आणि देखरेख ठेवली जात आहे.