नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनमध्ये योग गुरू रामदेव बाबा यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर मोठं विधान केलं आहे. ओवैसी जेवढे उलटे बोलतील, तेवढाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फायदा होणार आहे. राजकारणात ओवैसी यांना भाजपची बी टीम म्हटलं जातं. हे मी म्हणत नाही… पण ते जेवढे विरोधात बोलतील, तेवढा मोदींनाच फायदा होत आहे, असं रामदेव बाबा म्हणाले.
एक देश, एक कायदा या प्रश्नावर रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक देश एक कायदा झाला पाहिजे. ही आपल्या संविधानाची मूळ भावना आहे. यूसीसीची सुरुवात उत्तराखंडपासून झाली. ही चांगली गोष्ट आहे. येत्या काळात इतर राज्यही त्याची अंमलबजावणी करतील अशी आशा आहे. देशापेक्षा कुणीही मोठं नाही. या मुद्द्याला ओवैसी विरोध करत आहे. कारण ते उल्ट्या दिमागाचे आहेत. त्यांचे पूर्वजही देशविरोधी होते, असा घणाघाती हल्ला रामदेव बाबांनी चढवला.
ओवैसी मुस्लिमांचे ध्रुवीकरण रोखत आहेत. जे मुस्लिमांचे पालनहार बनत आहेत, त्यांना हटवण्याचं काम ओवैसी करत आहेत. ओवैसी जितके उल्टे बोलतील तितकाच मोदींना फायदा होईल. ओवैसीने हे करत राहावं. ओवैसी त्यांचं योगदान देत आहेत. राहुल गांधीही त्यांचं योगदान देत आहे. मोदीजींच्या लोकप्रियतेत त्यांचा पुरुषार्थ जितका आहे, तितकंच विरोधी पक्षांचं योगदानही महत्त्वाचं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावरही टीका केली. विरोधक जेवढे विरोधात बोलतील तेवढा मोदींना फायदा होईल. भाजप 400 च्या पुढे जाईल. जे लोक स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणतात त्यांच्या इतका मूर्ख अविवेकी कोणीच नसेल, असं ते म्हणाले. लालूजी, तेजस्वी आणि नीतीश कुमार यांना मी योग शिकवला. सर्वांनीच योग केला पाहिजे. लालूही योग करत होते. पण मध्येमध्ये त्यांनी उल्टं करायला सुरुवात केली. आजकाल तेजस्वी चांगला योग करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राहुल गांधींवरही भाष्य केलं. राहुल गांधी यांची फिटनेस चांगली आहे. आता त्यांनी राजकीय फिटनेसवर लक्ष दिलं पाहिजे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतच्या यात्रेचा काँग्रेसला फायदा झाला आहे. कर्नाटकात त्यांचं सरकार आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. काशी-मथुरा मंदिर आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. काशी-मथुरेसाठी मुसलमानांनी स्वत:हून पुढे आलं पाहिजे. राम आणि कृष्ण आपलेच वशंज आहेत, मंदिर बनलं पाहिजे, असं मुसलमानांनी म्हटलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.