भोपाळ | 21 जुलै 2023 : रोजगार खूप महत्त्वाचा असतो. याशिवाय जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळायलाच हवं. काही जण आपल्या हक्काच्या गोष्टी मिळवण्यासाठी दिवस-रात्र एक करतात. पण त्यांना त्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अर्थात त्यासाठी काही तांत्रिक गोष्टींचं देखील कारण असू शकतं. याशिवाय इतर कारणं देखील असू शकतात. पण काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडताना आपण पाहतो तेव्हा आपणही अस्वस्थ होतो. सध्या मध्य प्रदेशची एक महिला चर्चेत आहे. ती आपल्या दिव्यांग पतीला पाठीवर उचलून शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारत आहेत. पण तिची मागणी मान्य होत नाहीय. गेल्या 3 वर्षांपासून ती यासाठी संघर्ष करत आहे.
संबंधित महिलेचं नाव प्रियंका गोंड असं आहे. प्रियंका छतपूर जिल्हा पंचायतीच्या जनसुनावणीवेळी आपल्या पतीला कडेवर घेऊन आली आणि रडू लागली. आपल्या पतीला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, अशी मागणी ती करत होती. यावेळी प्रत्यक्षदर्शींना मोठा धक्का बसला. काहींनी महिलेच्या पतीची अवस्था पाहून संवेदना व्यक्त केल्या.
प्रियंका गोंड ही लवकुशनगर क्षेत्रातील परसनिया गावात पतीसोबत राहते. ती 2019 पासून आपल्या पतीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी खूप प्रयत्न करत आहे. ती पतीला कडेवर घेऊन जाते. आपलं म्हणणं मांडते, नोकरीची मागणी करते. पण तिला अजूनही त्यात यश मिळालेलं नाहीय. त्यामुळे ती आता हवालदिल झालीय.
प्रियंका गोंडने आज प्रसारमाध्यमांनादेखील प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने मोठं वक्तव्य केलं. “मी ज्योती मौर्य नाही जी पतीच्या वाईट दिवसांमध्ये त्याची साथ सोडेल. माझं 2017 मध्ये अंशुल गोंड यांच्यासोबत लग्न झालं होतं. पण लग्नानंतर वर्षभरात रस्ते अपघातात त्यांचे पाय अपंग झाले. तेव्हापासून मी त्यांना कडेवर घेऊन नेहमी इथे ये-जा करत आहे. माझी ही अशी अवस्था पाहून कोणत्याही अधिकाऱ्याच्या मनाला पाझर फुटत नाही. त्यामुळे आतापर्यंत अनुकंपा नियुक्ती मिळू शकलेली नाही”, अशी खंत प्रियंकाने व्यक्त केली.
अंशुल गोंड यांनीदेखील यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “माझी आई सरकारी शाळेत शिक्षिका होती. पण 2015 मध्ये आईचं रस्ते अपघातात निधन झालं. तेव्हापासून मी आईच्या जागेवर माझी अनुकंपा तत्वावर नियुक्ती करावी, यासाठी मागणी करतोय. पण अद्यापही माझी मागणी पूर्ण झालेली नाही”, असं अंशुल यांनी सांगितलं.
दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. नियमानुसार योग्य निर्णय घेतला जाईल. शासनाद्वारे जे निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत त्याच अनुशंगाने नियुक्ती केली जाते असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.