गाझियाबाद : पतीचे आजारपण आणि सततची आर्थिक चणचण यामुळे नैराश्येत असलेल्या महिलेने आपल्या मुलांना विषारी द्रव्य पाजून मग स्वतःही विष (Poison) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने कुटुंब प्रमुखाला रोख मदत दिली आहे, तर मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदतीचे आश्वासन दिले आहे. (Woman commits suicide with child in Ghaziabad due to financial crisis)
गाझियाबादमध्ये ट्रॉनिका सिटी पोलिस स्टेशनच्या इलायचीपूर गावातील अमन गार्डन कॉलनीमध्ये हे कुटुंब राहते. मयत महिला मोनिकाचा मोनूसोबत 2010 मध्ये विवाह झाला होता. मोनू मोबाईल रिपेअरिंगचे काम करायचा. मात्र अडीच महिन्यांपासून तो टीबीच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे आधीच जेमतेम असलेली आर्थिक परिस्थिती आणि त्यात पतीच्या उपचाराचा खर्च यामुळे घरात पैशांची खूपच चणचण निर्माण झाली होती. या विवंचनेतून मोनिकाने रविवारी दुपारी तिची मुलगी मनाली, साक्षी आणि मुलगा अंश यांना विषारी द्रव्य पाजून स्वतः विष प्राशन केले.
मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलींना दाखल करताना आईने विष दिल्याचे सांगितले नाही. दिवसअखेरीस आई आणि मुलाचा घरातच मृत्यू झाला होता, तर दोन्ही मुलींचाही सोमवारी पहाटे जीटीबी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी शनिवारी रात्रीच आई आणि मुलाचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले होते, तर दोन्ही मुलींचे मृतदेह जीटीबीमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले आहेत.
पतीच्या आजारपणामुळे मोनिका नैराश्यात होती. पीडित मोनूला प्रशासनाकडून 10,000 रुपयांची रोख मदत देण्यात आली आहे, तर डीएम साहेबांनी रेडक्रॉसच्या वतीने 25,000 रुपयांचा धनादेशही पाठवला आहे. मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी गावप्रमुखाकडून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडित कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल, असे एसडीएम संतोष कुमार राय यांनी सांगितले. (Woman commits suicide with child in Ghaziabad due to financial crisis)
इतर बातम्या
लग्नानंतरही भेटण्यासाठी पाठलाग, विवाहितेनं आयुष्य संपवलं, नांदेडमधली धक्कादायक घटना