नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100व्या भागाच्या निमित्ताने राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्यावेळी स्वयं सहायता समूहाची सदस्य पूनम देवी यांना प्रसव पीडा होऊ लागली. त्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यातआलं. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळ आणि ही महिला सुखरूप आहे. बुधवारी विज्ञान भवनात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला काही विशेष आमंत्रितांना बोलावण्यात आलं होतं. त्यात ही महिलाही होती. मोदींच्या एका मन की बात कार्यक्रमात या महिलेने लखमीपुरी खीरी येथे स्वयं सहायता समूहाच्या सदस्य म्हणून केलेल्या कामाचा उल्लेख केला होता.
एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, पूनम ही नऊ महिन्याची गर्भवती होती. विज्ञान भवनातील संमेलनात भाग घेण्यासाठी ती आली होती. त्यावेळी तिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. तिने त्याबाबतची तक्रार करताच तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिने एका बाळाला जन्म दिला. ती आणि तिचं बाळ सुखरूप आहे. मुलाच्या जन्मानंतर ही महिला आपल्या गावाकडे गेली आहे, असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
लखीमपूर खीरी येथील स्वयं सहायता समूहाकडून केळ्याच्या पानं आणि झाडापासून फायबरचा उपयोग करून हँडबॅग, चटई आणि अन्य वस्तू बनवल्या जातात. त्यामुळे गावातील महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. शिवाय हाताला कामही मिळालं आहे. संघर्षावर मात करून शून्यातून अस्तित्व निर्माण करणाऱ्या 100 लोकांचा पंतप्रधानांनी मन की बातमध्ये उल्लेख केला होता. त्या 100 जणांपैकी पूनम या एक होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मन की बात कार्यक्रमाचा आज 100 वा एपिसोड होता. त्यानिमित्ताने दिल्लीतील विज्ञान भवनात मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती तसेच प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यावेळी उपस्ंथित होते.
आज मन की बातच्या कार्यक्रमाचा 100 वा भाग दाखवण्यात आला. यावेळी ज्या लोकांनी छोट्या छोट्या उद्योगातून मोठी उद्योग निर्मिती केली. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करून आदर्श घालून दिला अशा लोकांशी मोदींनी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. तसेच आपल्या कार्यात प्रगती करण्याच्या शुभेच्छाही दिल्या.