नवी दिल्ली : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं. मी बोलतच राहणार. मला तुरुंगात टाका. माझी खासदारकी रद्द करा. कायमस्वरुपीही माझं लोकसभेचं सदस्यत्व घालवलं तरी मी बोलतच राहणार. प्रश्न विचारत राहणार. मी माफी मागणार नाही. कारण मी गांधी आहे. सावरकर नाही, असं पुन्हा म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला डिवचलं. त्यामुळे आता भाजप राहुल गांधी यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माझी खासदारकी रद्द झाल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांनी मला पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आम्ही सर्व मिळून काम करू, असं राहुल गांधी म्हणाले. तुम्ही माफी मागितली असती तर तुमची खासदारकी वाचली असती. तुम्ही माफी का नाही मागितली? असा सवाल राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्यावर मी गांधी आहे. गांधी कधीच माफी मागत नाही. मी सावरकर नाहीये, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.
मोदींनी विरोधकांच्या हातात हत्यार दिलं आहे. प्रकरणसमोर आल्याने वाट लागेल असं त्यांना वाटलं. त्यामुळे मोदी पॅनिक झाले आहेत. अदानी हे भ्रष्ट व्यक्ती आहेत. मोदी त्यांना का वाचत आहेत? भाजपचे लोक त्यांना वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अदानीवर आक्रमण म्हणजे देशावर आक्रमण असं भाजपचे लोक सांगत आहेत. म्हणजेच त्यांच्या मनात अदानी म्हणजे देश आहे आणि देश म्हणजे अदानी आहे. अदानीला वाचवण्यामागचं कारण म्हणजे अदानी दुसरे तिसरे कोणी नसून अदानी म्हणजेच मोदी आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मी कोणताही दुसरा मार्ग शोधणार नाही. ही माझी तपस्या आहे. माझ्या जीवनातली तपस्या आहे. मला हाणा, मारा… काहीही करा. या देशाने मला सगळं काही दिलं आहे, प्रेम, सन्मान दिला आहे म्हणून मी हे करत आहे. त्यांनी माझी कायम स्वरुपी खासदारकी रद्द केली तरी मला काही फरक पडत नाही. मी संसदेत असेन नसेन मला फरक पडत नाही. मी देशासाठी लढत राहणार. मला मारो. काहीही करो तरीही मी फक्त सत्य पाहतो. मला इतर कोणत्याही गोष्टीत रस नाही. हे माझ्या रक्तात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तुमच्या विधानाने ओबीसींचा अवमान झाल्याचं विचारण्यात आलं. त्यावर राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ दिला. हा देशातील ओबीसींचा मुद्दा नाहीये. अदानी आणि मोदी यांच्या संबंधाचं हे प्रकरण आहे. भारत जोडो यात्रेतील माझी भाषणं काढून पाहा. मी कधीच ओबीसींच्या विरोधात बोललो नाही. उलट सर्व धर्म आणि वर्गाच्या लोकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, देशातील सर्व लोक एकच आहेत. सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. देशात बंधूभाव राहिला पाहिजे, असं मी म्हणालो होतो, असं सांगतानाच ओबीसींचा मुद्दा काढून मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलीत केलं जात आहे, असंही ते म्हणाले.