श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील जगातील सर्वात उंच सिंगल-आर्च रेल्वे ब्रिजवरील ओव्हरआर्क डेकचा अंतिम भाग 13 ऑगस्ट रोजी लॉन्च केला जाईल. त्या क्षणाची गोल्डन जॉईंट म्हणून नोंद होईल. चेनाब नदीच्या खोऱ्याच्या दोन टोकांपासून ओव्हरआर्च डेक (overarch deck) दोन्ही बाजूने समान पद्धतीने ढकलला जात आहे आणि तो शेवटी आर्चच्या मध्यभागी येऊन मिळेल. “ते जोडणे हे एक गोल्डन जॉइंट आहे. एकदा गोल्डन जॉइंट पूर्ण झाल्यावर आम्ही म्हणू शकतो की पूल सुमारे 98% पूर्ण झाला आहे,” अफकॉन्सचे उप व्यवस्थापकीय संचालक गिरीधर राजगोपालन म्हणाले. त्यामुळे या जगातील सर्वात उंच ब्रिजकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा पूल तयार करण्यासाठी नॉर्थ रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL)चे मोठे सहकार्य लाभले आहे.
अभियांत्रिकी कौशल्य पणाला लागलेल्या चेनाब ब्रिज बांधकामांमध्ये आतापर्यंत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. भूरचनाशास्त्र, भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानापासून सुरुवात करून या क्षणापर्यंत येण्यासाठी अभियंते आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी या सगळ्याचा सामना केला आहे. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आर्च पूर्ण केला, तेव्हा आमच्या क्षमतेच्या दृष्टीने प्रकल्प इतक्या अचूकतेने पूर्ण केला कि त्यात कोणतीही विसंगती नव्हती. त्यामुळे आम्हाला प्रकल्पातील उर्वरित भागाचे काम हाताळण्यात खूप आत्मविश्वास मिळाला. नॉर्थ रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) सोबत मिळून, आम्ही गोल्डन जॉइंटच्या आगामी सुवर्ण क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत, असं गिरीधर यांनी सांगितलं.
जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिजच्या बांधकामात बरीच अभियांत्रिकी कामे पहिल्यांदाच होत आहेत. ब्रिज पूर्ण झाल्यावर तो आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असेल. चेनाब ब्रिजच्या व्यतिरिक्त अफकॉन्सने जम्मू आणि काश्मीरच्या प्रतिकूल प्रदेशात कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड साठी 16 इतर रेल्वे ब्रिज बांधत आहेत. सर्व ब्रिज उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग आहेत.
अफकॉन्सने अलीकडेच 16 केआरसीएल (KRCL) ब्रिज प्रकल्पातील एका पुलाचे मुख्य डेक स्लॅब कॉंक्रिटिंग पूर्ण केले जे कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे. सुमारे 1,550 क्युबिक मीटर कॉंक्रिटिंग चार टप्प्यांत 70 दिवसांत करण्यात आले. हे संपूर्ण काम जम्मू आणि काश्मीरमधील सांगलदानच्या डोंगराळ प्रदेशात जमिनीपासून 90 मीटरपेक्षा जास्त उंचीवर करण्यात आले.