गजबची कंपनी… HR ने कर्मचाऱ्यांना विचारले ‘कामाचा तणाव आहे का’, होय उत्तर देताच काय झाले वाचा?

| Updated on: Dec 11, 2024 | 10:18 AM

YesMadam Clarification On Layoff: येस मॅडममधील वर्क कल्चरवर झालेल्या गदारोळात कंपनीने त्वरीत स्पष्टीकरण केले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावरील अलीकडील पोस्टमुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून दिलगीर व्यक्त करत आहोत.

गजबची कंपनी... HR ने कर्मचाऱ्यांना विचारले कामाचा तणाव आहे का, होय उत्तर देताच काय झाले वाचा?
Yes Madam
Follow us on

YesMadam Clarification On Layoff: दिल्लीजवळील नोएडामधील कंपनी सध्या चर्चेत आली आहे. ऑन-डिमांड ब्यूटी सर्व्हिस प्लॅटफॉर्म ‘यस मॅडम’ चर्चेत आली आहे. यस मॅडम कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एचआर विभागाकडून एक मेल गेले. त्या मेलमध्ये तुमच्यावर कामाचा तणाव आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांनी होय उत्तर दिले, त्यांच्यासंदर्भात कंपनीने जे केले त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्या कंपनीने होय उत्तर देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले.

100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढले

होम सलून सेवा देणारी यस मॅडम कंपनी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या कंपनीने 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला. त्यात विचारले होते की, तुम्ही तणावात आहात का? तुमच्यावर कामाचा ताण आहे का? ज्या कर्मचाऱ्यांनी होय उत्तर दिले, त्यांना नोकरीवरुन काढून टाकले.

यस मॅडम कंपनीच्या एचआर विभागाचा हा ईमेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मेलनुसार कंपनीने कर्मचाऱ्यांचा तणावाचा स्तर मोजण्यासाठी एक सर्व्हे केला. या सर्व्हेचा जो अहवाल आला, त्यानंतर धक्कादायक प्रकार सुरु झाला. या सर्व्हेत गंभीर तणावात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने नोकरीवरुन कमी केले.

काय आहे त्या मेलमध्ये

एचआरने मेलमध्ये लिहिलेले, प्रिय टीम, कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावासंदर्भात भावना समजून घेण्यासाठी आम्ही एक सर्व्हे केला. त्यात अनेकांनी आपल्या चिंता व्यक्त केल्या. त्याला आम्ही महत्व देतो आणि त्याचा सन्मान करतो. कंपनीत कामाचे निरोगी वातावरण असावे, यामुळे आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला. कामाच्या ठिकाणी कोणताही कर्मचारी तणावात नको. त्यामुळे आम्ही ज्या कर्मचाऱ्यांनी गंभीर तणाव असल्याचे म्हटले आहे, त्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.

कंपनीकडून आला खुलासा

येस मॅडममधील वर्क कल्चरवर झालेल्या गदारोळात कंपनीने त्वरीत स्पष्टीकरण केले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावरील अलीकडील पोस्टमुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून दिलगीर व्यक्त करत आहोत. त्या पोस्टमध्ये आम्ही म्हटले होते की, तणावात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही काढून टाकले आहे. परंतु आम्ही असे अमानवी पाऊल आम्ही कधीही उचलणार नाही, हे स्पष्ट केले पाहिजे. आमची टीम एका कुटुंबासारखी आहे. आमच्या टीमचे समर्पण, कठोर परिश्रम हेच आमच्या यशाचा पाया आहे.