लखनऊ, दि. 27 नोव्हेंबर | उत्तरप्रदेश राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर पोलीस अॅक्सनमोडमध्ये आले आहेत. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवर लावलेले अवैध लाउडस्पीकर सोमवारी विशेष मोहीम राबवून काढण्यात आले. लाउडस्पीकर काढण्यासाठी पोलिसांना नागरिकांनीही सहकार्य केले. धार्मिक स्थळांवरील अवैध भोंगे काढण्याचे आदेश उत्तर प्रदेशातील योगी सरकारने दिले होते. त्यानंतर राज्यभरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी राज्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी अवैध लाउडस्पीकर काढण्याची कारवाई केली. त्यात मशीदीप्रमाणे मंदिरांचाही समावेश आहे. लखनऊमधील तकियावाली मशिद, गाजीपूरमधील अनेक भागातील लाउडस्पीकर काढण्यात आले. लखनऊ जिल्ह्यांत 503 ठिकाणी लाउडस्पीकर काढण्यात आले. लखनऊमध्ये पोलीस अधीक्षक बृजेशकुमार श्रीवास्तव यांनी आपल्या टीमसोबत सकाळी पाच वाजताच कारवाई सुरु केली. यावेळी मशीद आणि मंदिरावर लाउडस्पीकरसंदर्भातील नियमांचे पालन होत नसताना दिसले. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे त्यांनी कारवाई सुरु केली.
कानपूर शहरात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. कानपूरचे पोलीस आयुक्त आर.के. स्वर्णकार यांनी विशेष अभियान राबवून लाऊडस्पीकर काढले. चित्रकूटमध्ये कारवाई करण्यात आली. फर्रुखाबादमध्ये 37 ठिकाणी कारवाई झाली. ललितपूर येथील तीन मशीदवरुन लाउडस्पीकर काढले. कन्नौजमध्ये 20 मशीदींवर कारवाई झाली. फतेहपूरमध्ये 14 तर औरैयामध्ये 19 ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी त्यासाठी सहकार्य केले.
उत्तर प्रदेशातील योग सरकार धार्मिक स्थळावरील अवैध लाउडस्पीकर काढण्याची कारवाई करत आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकवेळा ही मागणी केली. परंतु ठोस कारवाई झाली नाही. राज ठाकरे यांनी लाउडस्पीकर न काढले गेल्यास हनुमान चालीसा करण्याचे म्हटले होते. यासाठी मनसेकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर काही ठिकाणी कारवाई झाली होती. परंतु राज्यात सर्वत्र अजून अवैध लाउडस्पीकर काढण्याची कारवाई झालेली नाही.