लखनऊ: योगी आदित्यनाथ सरकारमधील राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. प्रेम ब्रिम काही असत नाही. केवळ सेक्सचं आकर्षण असतं, असं धक्कादायक विधान करतानाच मुले असो वा मुली दोघांनाही सुधारण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य गाठत नाही, तोपर्यंत या भानगडीत पडू नका, असं मंत्री प्रतिभा शुक्ला म्हणाल्या. मुली नटून सजून घरातून निघाल्या तर समजून जा काही तरी गडबड आहे. त्यांना सांभाळण्याची गरज आहे, अशा सूचनाही शुक्ला यांनी केल्या. मात्र, शुक्ला यांनी विद्यार्थ्यांसमोरच ही धक्कादायक विधाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ मोहिमेअंतर्गत इटावा येथे राष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री प्रतिभा शुक्ला यांनी वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावरच लक्ष्य केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. मुलांनी प्रेमा ब्रिमाच्या भानगडीत पडू नये. त्यांनी आपल्या शिक्षणावर लक्ष द्यावं. प्रेम ब्रिम काही नसतं. ते केवळ अपोझिट सेक्सचं आकर्षण असतं. त्यापासून दूर राहण्याची गरज आहे, असं प्रतिभा शुक्ला म्हणाल्या.
यावेळी त्यांनी मुलांना प्रेमाची स्वप्न न पाहण्याचं आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी प्रेमाची स्वप्न पाहण्याऐवजी आपल्या ध्येयाची स्वप्न पाहा. मेहनत करा आणि लक्ष्य गाठा असं विद्यार्थ्यांना खुलेपणाने सांगा, असं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे, असा आग्रही त्यांनी धरला.
मुलांच्या वाढत्या वयाबरोबर आईवडिलांची जबाबदारीही वाढते. मुलं मुली कुठे जात आहेत, याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. मुलं मुली कुणाला भेटत आहेत. का भेटत आहेत यावरही लक्ष दिलं पाहिजे. मुलींनीही आपल्या आईला मैत्रीण समजून आईशी चर्चा करावी.
आयांनीही मुलींच्या समस्यांवर तात्काळ मार्ग काढला पाहिजे. जर तुमच्या मुलाचा खर्च वाढू लागला असेल तर समजून जा हे चांगले संकेत नाहीत. अशा गोष्टीमुळे गडबड वाढण्याचे चान्सेस अधिक आहेत, असंही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी मुलांना मोबाईलपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. मोबाईल ही एक नशा आहे. त्याचा अधिक वापर हानिकारक आहे. मुलींनी स्वत:ला सुरक्षित ठेवून आपलं चारित्र्य चांगलं ठेवलं पाहिजे. प्रेमच करायचं असेल तर आपल्या ध्येयावर करा. उद्देश्यांवर करा. मुलींना आपलं संरक्षण स्वत: केलं पाहिजे. आपलं चारित्र्य चांगलं ठेवलं पाहिजे. मुलींनी स्वावलंबी बनलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
मुलींना चुकीच्या मार्गाने जाण्यापासून रोखणं गरजेचं आहे. आई-वडील आणि गुरु मुलींच्या सर्वात जवळ असतात. त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे. मुलींनीही आईवडील आणि आपल्या गुरुजनांचा सन्मान ठेवला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.