जयपूर : सवाई मान सिंग रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निष्काळजीपणामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. राजस्थानमधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला चुकीच्या रक्तगटाचे रक्त देण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा चुकीच्या रक्तदानामुळे मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
जयपूरमधील सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये चुकीच्या रक्त संक्रमणामुळे तरुणाची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. चुकीचे रक्त चढवल्यानंतर त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणे बंद केले. प्रकरण समोर येताच वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चौकशीचे आदेश दिले.
रस्ता अपघातात जखमी झाल्याने सचिन शर्मा या २३ वर्षीच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. चुकीचे रक्त चढवल्यामुळे सचिनचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सचिनचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह होता. पण त्याला कर्मचाऱ्यांनी ओ पॉझिटिव्ह रक्त चढवले. त्यामुळे सचिनची प्रकृती अधिकच बिघडल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
सचिनचा अपघात झाल्याने त्याला रक्त चढवण्याची वेळ आली होती. रक्तची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्याला एबी पॉझिटिव्ह रक्त हवे होते, पण वॉर्ड बॉयने दुसऱ्या रुग्णाच्या ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्ताची स्लिप दिली. यानंतर सचिनला AB+ ऐवजी O+ रक्त चढवण्यात आले. रुग्णालयाच्या अधीक्षकांनी लगेचच कमिटी स्थापन करुन चौकशीचे आदेश दिले आहेत.
एसएमएस हॉस्पिटलचे अधीक्षक अचल शर्मा यांनी सांगितले की, प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली असून अहवालानुसार कारवाई केली जाईल. चुकीचे रक्त चढवल्यामुळे रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आले पण रुग्णाची प्रकृती सतत खालावत गेली. शेवटी त्याचा मृत्यू झाला.