ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या… अज्ञात शस्त्रधारी तरुणाचा घरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

| Updated on: Jul 21, 2023 | 2:45 PM

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसत असताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तिकडे हत्यारे सापडली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे.

ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या... अज्ञात शस्त्रधारी तरुणाचा घरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Mamata Banerjee
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोलकाता | 21 जुलै 2023 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्या घरात एका शस्त्रधारी तरुणाने प्रवेश केला. कुकरी आणि मोठा सुरा घेऊन त्याने ममता बॅनर्जी यांच्या घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे तो ज्या गाडीतून आला होता, त्यावर पोलीस असं लिहिलेलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची चौकशी केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे हत्यारे सापडली. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. त्याच्याकडे एक संशयास्पद बॅगही आढळून आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला थेट कालीघाट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्याकडील गाडीच्या मालकाचा शोध लागला आहे. नूर हमीम असं त्याचं नाव आहे. या तरुणाला अटक करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या घराभोवती आधीपासूनच कडक सुरक्षा व्यवस्था असते. मात्र, असं असतानाही ममता बॅनर्जी यांच्या घरात शस्त्रधारी तरुण घुसल्याने या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

सुरा, कुकरी आणि ड्रग्स

तृणमूल काँग्रेसकडून 21 जुलै हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कोलकात्याच्या धर्मतलामध्ये मोठी रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीला ममता बॅनर्जी यांच्यासहीत टीएमसीचे इतर नेते संबोधित करणार आहेत. त्यापूर्वीच या तरुणाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाकडे मोठा सुरा, कुकरी, ड्रग्स आणि संशयास्पद बॅग सापडली आहे. हा तरुण पोलिसांच्या गाडीतून मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जात होता, असं कोलकाताचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी सांगितलं.

केंद्रीय एजन्सीचं पत्र

या तरुणाच्या संशयास्पद हालचाली पाहून मुख्यमंत्री कार्यालयाबाहेरील तैनात असलेल्या पोलिसांची त्याच्याकडे नजर गेली. कारण त्याची गाडी वेगाने जात होती. पोलिसांनी त्याला थांबवलं. त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याच्या बोलण्यात विरोधाभास जाणवला. त्यानंतर त्याची झडती घेतली असता शस्त्र जप्त करण्यात आली. त्याच्याकडे केंद्रीय एजन्सीचं एक पत्रही होतं, असं गोयल यांनी सांगितलं. या तरुणाकडे शस्त्र कुठून आलीत? याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचा उद्देश काय होता याचीही चौकशी पोलीस करत आहेत. या आरोपीला अटक केली हे पोलिसांचं मोठं यश असल्याचं सांगण्यात येतं.

तीन यंत्रणांकडून चौकशी

या तरुणाकडे केंद्रीय एजन्सीचं आयडी कार्ड सापडलं आहे. ते त्याच्याकडे कुठून आलं? हरीश चटर्जी स्ट्रीटवर तो काय करत होता? असे प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाले आहेत. त्याच्या हेतूची चौकशी केली जात आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. एसटीएफ, स्पेशल ब्रँच आणि स्थानिक पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे, अशी माहितीही गोयल यांनी दिली.