नाशिक : सारस्वतांचा मेळा आज समारोपाऐवजी काळं फासण्याच्या घटनेनं चर्चेत राहिला. लोकसत्ताचे संपादक आणि लेखक गिरीश कुबेरांना नाशिकच्या साहित्यनगरीत काळं फासलं गेलं. साहित्य संमेलनातल्या एका परिसंवादाला उपस्थित राहण्यासाठी गिरीश कुबेर पोहोचले. मात्र त्याआधीच संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले. तेव्हा अनेकांना ब्रिगेडचे कार्यकर्ते कुबेरांकडे नाराजीचं निवेदन देण्यासाठी जात असल्याचं वाटत होतं. मात्र त्याच दरम्यान त्या कार्यकर्त्यांनी कुबेरांच्या चेहऱ्याला काळं फासलं.
गिरीश कुबेर लिखित ”रेनिसान्स स्टेट : ‘अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड आणि अनेक राजकीय पक्षांचा आक्षेप आहे. आक्षेपांनुसार त्याच पुस्तकातल्या काही मजकुरावरुन गिरीश कुबेरांना काळं फासण्यात आलं. या पुस्तकातल्या 4 मजकुरांवर मोठे आक्षेप आहेत.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर कब्जा करण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात घडवला. शिवाजी महाराजांच्या हयातीतल्या अष्टप्रधान मंडळातल्या मंत्र्यांना संभाजीराजेंनी ठार मारलं. याच चुकांमुळे स्वराज्याची कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि याची शिक्षा पुढे संभाजीराजांना भोगावी लागली.
सत्तेसाठी संभाजी महाराजांनी राणी सोयराबाईंना ठार मारलं.
संभाजीराजांकडे शिवाजी महाराजांसारखी सहनशीलता, परराष्ट्र धोरण नव्हतं. शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी रयतेवर कधीही जुलूम केले नाहीत. पण संभाजी महाराजांच्या सैन्याने जुलूम-अत्याचार केले.
इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जुळणारे कोणते व्यक्तिमत्त्व असेल, तर ते बाजीराव पेशवे आहेत.
दरम्यान, वादग्रस्त लिखाणानं वाढ ओढवून कुबेरांची ही पहिली वेळ नाहीय. याआधी कुबेरांनी ”बळीराजाची बोगस बोंब” या शीर्षकानं अग्रलेख लिहिला होता. ज्यात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आणि अतिवृष्टीच्या मदतीवर कुबेरांनी प्रश्न उभे केले होते. यानंतर असंतांचे संत या अग्रलेखावरुन बराच वाद झाला. लोकसत्ता आणि संपादक गिरीश कुबेरांवर टीकेची झोड उठली. नंतर कुबेरांनी लोकांची दिलगिरी व्यक्त करुन तो अग्रलेख मागे घेतला.
कुबेरांच्या या लिखाणाबद्दल आम्ही संपादक गिरीश कुबेरांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दुसरीकडे भाजपात मात्र काळं फासण्याच्या घटनेवर दोन मतं दिसली. आधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या घटनेला अॅक्शनची रिअॅक्शन म्हणत शाईफेकीचं समर्थन केलं. नंतर मात्र साहित्य संमेलनात शाईफेक योग्य नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली.
इकडे राष्टवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणतायत की शाईफेकीला स्वतः गिरीश कुबेर कारणीभूत आहेत. दुसरीकडे शरद पवार कुबेरांवरच्या शाईफेकीचा निषेधही नोंदवतायत. तर संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया देणं पसंत केलं. आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांबरोबरच शाईफेक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, असं संजय राऊत म्हणाले.
मात्र संभाजी ब्रिगेडच्या दाव्यानुसार या लिखाणासंदर्भात खूप आधीपासून तक्रारही दाखल आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मे महिन्यात मुख्यमंत्री ठाकरेंना याच पुस्तकावर बंदीसंदर्भात पत्रही लिहिलं होतं. मात्र अद्याप त्यावर सरकार पातळीवर कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, अनेक महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडसह राष्ट्रवादी आणि भाजपनंही कुबेरांच्या रेनिसान्स स्टेट या पुस्तकावर बंदीसाठी आग्रह धरलाय. आज काळं फासण्याच्या या घटनेनं जुन्या वादाला फक्त नव्यानं तोंड फुटलंय. (Debate over Girish Kubera’s book on the last day of Marathi Sahitya Sammelan)
इतर बातम्या