मुंबई : राज्यात सध्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून रंगताना दिसून येत आहे. कधी संजय राऊतांचं वक्तव्य तर कधी भाजपने केलेली टीका, तर आशिष शेलार विरुद्ध मुंबईच्या महापौर अशा अनेक मुद्द्यावरून रोज एकमेकांवर टीका होताना दिसाते आहे. मात्र आता जो सामना रंगलाय तो थेट, फडणवीसांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून, 10 खासदारही निवडून आणता आले नाही, मात्र पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणं चूक नाही असा खोचक टोला फडणवीसांनी पवारांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच लगावला आणि राष्ट्रवादी-शिवसेनेनं तात्काळ पलटवार केला. त्यामुळे पुन्हा राज्यातले राजकारण तापलंय.
फडणवीसांना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
विधानसभेच्या प्रचारावेळीही पवार-फडणवीस सामना
फडणवीस अधूनमधून पवारांना टार्गेट करतच असतात. 2019च्या विधानसभा निवडणुकीतल्या प्रचारात पवार आणि फडणवीसांमध्येच पैलवानावरुन सामना रंगला होता. 2019 च्या विधानसभेच्या निकालात भाजप 105 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. पण पवारांनी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फिट करुन, फडणवीसांना झटका दिला. त्यामुळं राष्ट्रवादी आता दिल्लीत चमत्काराची अपेक्षा करतेय.
राज ठाकरेंकडून पवारांचं कौतुक
फडणवीसांनी पवारांना वाढदिवसाच्या दिवशी टोला लगावला असला, तरी राज ठाकरेंनी मात्र पवारांचं कौतुक केलंय. राजकीय खेळी करण्यात शरद पवार माहिर आहेत. 2024 मध्ये मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्यासाठी पवारही प्रयत्न करतच असतात. त्यामुळं पवार भाजपच्या निशाण्यावर येणं हे स्वाभाविक आहे. साताऱ्यातल्या पावसातल्या सभेने जणू राष्ट्रवादीवर राज्यात मतांचा पाऊस पाडला आणि त्यानंतर महाविकास आघाडीची गाठ बांधून ठाकरे सरकार स्थापन झाल्यावर देशाचे डोळे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागले. काण जे कुणालाही जमले नाही, त्या भाजपला शह देत पवारांनी राज्यात सरकार बसवले.