मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना आणि शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यात एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं. गोव्यातील सर्व 40 नाही पण जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचा गोव्यात जो श्रीगणेशा झालाय. तोच फॉर्म्युला आगामी काळात महाराष्ट्रातही पाहायला मिळेल का ? अशी चर्चा जोरात सुरु झालीय. विशेष म्हणजे संजय राऊतांनी याबाबत अजिबात नाही म्हटलेलं नाही.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे शेजारच्या गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवत या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी सा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू होते. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, त्याला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आज मोठा निर्णय जाहीर केला, असं प्रफुल पटेल पत्रकार परिषदेत म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा या तिन्ही पक्षाचे नेते करतात. तर कधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाच्या रथावर स्वार होऊ पाहतात. काँग्रेसच्या याच पवित्र्यामुळं गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचं जमलं नाही. त्यामुळं महाराष्ट्रातही भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होऊ शकते असं राजकीय विश्लेषकांनाही वाटतेय.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही याआधीही क्लीअर संकेत दिलेलेच आहेत. काँग्रेस स्वबळावर लढू इच्छिते. काँग्रेस आणि भाजपची युती अजिबात होऊच शकत नाही आणि भाजपला रोखणं हे उद्धव ठाकरेंचंही मिशन आहे आणि शरद पवारांचंही. त्यामुळं गोव्यात जशी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आली, तशीच युती महाराष्ट्रात 2024च्या विधानसभा निवडणुकीत फार कठीण नाही.
इतर बातम्या :