मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून जेम्स लेनवरून (James Lane) राज्यात वाद सुरू आहे. मात्र तब्बल 20 वर्षानंतर जेम्स लेन नावाचं भूत अचानक बोलायला लागलंय. ज्या माणसाच्या विकृत लेखणीमुळे महाराष्ट्राच्या समाजकारणात विष पेरलं गेलं, तो जेम्स लेन 2003 ते 2022 अशी 19 वर्ष या विषयावर मूग गिळून गप्प होता. मात्र जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) आणि जेम्स लेनचा मुद्दा बाहेर काढला आणि तेव्हा त्याच्या 5 दिवसातच जेम्स लेननं इंडिया टुडे या वृत्तसंस्थेला मेलद्वारे एक मुलाखत दिली. आता जेम्स लेननं काय स्पष्टीकणर दिलंय., त्याआधी जेम्स लेनचा नेमका वाद काय, आणि पुरंदरेंवर काय आरोप होते. ते समजून घ्या. जेम्स लेननं ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ नावाचं पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकातून इतिहासाचं विद्रुपीकरण आणि चिखलपेक केली गेली आणि जेम्ल लेनला या लिखाणासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी माहिती पुरवल्याचा आरोप झाला, त्यावरून राज्याच्या राजकारणात बराच वाद झाला.
आता या आरोपांवर पुरंदरे हयात नसताना आणि ते ही 20 वर्षानंतर जेम्स लेन काय म्हणतोय, ते बघा. प्रश्न होता बाबासाहेब पुरंदरेंनी तुम्हाला तुमच्या पुस्तक लिखाणात काही मदत केली का? त्यावर जेम्ल लेननं म्हटलं की, छत्रपती शिवरायांचं पुस्तक लिहिताना पुरंदरेंची मला कोणतीही मदत झाली नाही. मला कुणीही माहिती पुरवली नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पुस्तकात मी कोणतेही ऐतिहासिक तथ्य मांडले नाहीत, असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. पण इतकी वर्ष जेम्ल लेन कुठं होता, तो आत्ता समोर आला की आणला गेला? दुसरं म्हणजे जेम्स लेनच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुरंदरेंचं नाव होतं, मग पुरंदरेंनी माहिती दिली नाही, हा दावा जेम्स लेन का करतोय., असे प्रश्न उभे केले जातायत.
2003 पासून ते 2022 पर्यंत जेम्स लेनचा मुद्दा दर 4 वर्षांनी बाहेर निघत आलाय. आणि योगायोगानं त्या तोंडावर निवडणुका राहिल्या आहेत. 1990 साली अमेरिकन लेखक जेम्स लेननं पहिल्यांदा भारताला भेट दिली. सुरुवातीला त्याला महाभारत आणि रामायणावर लिहायचं होतं. त्यासाठी पुण्यातल्या भांडारकर संशोधन मंडळात तो जाऊ लागला. त्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासाकडे तो आकर्षित झाला. आणि पुढे त्यानं विचार बदलून शिवाजी महाराजांवरच पुस्तक लिहिण्याच ठरवलं. अखेर 2003 मध्ये जेम्स लेननं ‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित केलं. ऑक्सफर्ड इंडिया प्रेसनं ते पुस्तक छापलं आणि प्रसिद्द केलं. त्या पुस्तकातून इतिहासाशी छेडछाड झाल्याचं समोर येताच बंदीची मागणी सुरु झाली. नंतर महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ विचारवंतांनी ऑक्सफर्ड इंडिया प्रेसला पत्र लिहून बंदीची मागणी केली. नोव्हेंबर 2003 साली ऑक्सफर्ड प्रेसनं त्याबद्दल माफी मागितली.
नोव्हेंबर 2003 पर्यंत हे प्रकरण मर्यादीत होतं. या वादात पहिली राजकीय उडी घेतली ती शिवसेनेनं. लिखाणासााठी संशोधन म्हणून जेम्स लेन पुण्यातल्या भांडारकर मंडळात जात होता. म्हणून शिवसेनेनं 22 डिसेंबर 2003 ला भांडारकर मंडळाविरोधात आवाज उठवला. शिवसेनेचे तत्कालीन नेते रामभाऊ पारेखांनी भांडारकर संस्थेतल्या श्रीकांत बहुलकरांना काळं फासलं. भांडारकरविरोधात पुण्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. मात्र तेव्हा पक्ष म्हणून शिवसेनेची अधिकृत भूमिका वेगळीच निघाली. तेव्हा शिवसेनेत असलेले राज ठाकरे पुण्यात पोहोचले. एका शिवसैनिकानं काळं फासलं म्हणून राज ठाकरे भांडारकरच्या श्रीकांत बहुलकरांच्या घरी गेले आणि राज ठाकरेंसमोर शिवसैनिकांनी केलेल्या कृत्याची माफी मागितली.
2003 नंतर जानेवारी 2004 ला या वादात संभाजी ब्रिगेडनं उडी घेतली. भांडारकर संशोधन मंडळानंच जेम्स लेनना माहिती दिल्याच्या आरोपात संभाजी ब्रिगेडनं भांडारकर मंडळ फोडलं. आणि तिथून या वादात राष्ट्रवादीची एन्ट्री झाली. 2004 च्या विधानसभा प्रचारात आर.आर. पाटलांनी हा मुद्दा लावून धरला.आणि त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आजवरचे सर्वाधिक म्हणजे 71 आमदार निवडून आले. पुढे 2015 साली भाजप सरकारनं बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. त्याविरोधार राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी मोहिम सुरु केली.
2015 नंतर हा मुद्दा मागे पडला. पुरंदरेंचंही निधन झालं. हा वाद आता इतिहासजमा झाल्याचं वाटत असतानाच. राज ठाकरेंनी काल-परवा पुन्हा त्या वादाला फोडणी दिली. आश्चर्य म्हणजे ज्या विकृत इतिहास लिखाणावरुन इतका गहजब झाला, तो जेम्स लेन आता स्वतःला इतिहासकार मानत नाही. आणि ज्यांच्यावर आरोप झाले., ते बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा स्वतःला कधी इतिहासकार म्हणवून घेतलं नाही. सध्यस्थितीची शोकांतिका अशी आहे., की ज्यांनी ज्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे, ते त्यावर आज बोलत नाहीयत. आणि ज्यांनी 20 वर्षांपूर्वी तोंड उघडायला हवं होतं., त्यांना आता कंठ पुठलाय.
जेम्स लेनविरोधात महाराष्ट्रात ज्यांनी पहिल्यांदा आवाज उठवला, ती शिवसेना आज पुरंदरे आणि जेम्स लेन प्रकरणावर मौन आहे. ज्या राज ठाकरेंचा पिंड कोणत्याही भीडभाडविना सर्वपक्षीयांना झोडपण्याचा होता, ते राज ठाकरे आज महागाईवर मौन आहेत. ज्या सदावर्तेंसोबत पडळकरांनी एसटी आंदोलन गाजवलं, त्या सदावर्तेंवर झालेल्या पैश्यांच्या आरोपांवर गोपीचंद पडळकर मौन आहेत. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीनं वीजकपातीवरुन भाजप सरकारविरोधात रान उठवलं होतं, ते आता वीजटंचाईवर हतबलपणे मौन आहेत. ज्या चित्रा वाघांनी प्रत्येक महिलेवरच्या अत्याचारासाठी आवाज उठवण्याचं प्रण केलाय., त्या चित्रा भाजपच्या गणेश नाईकांवरच्या आरोपांवर मौन आहेत. जर आपल्या विषारी लेखणीबद्दल जेम्स लेन 20 वर्षांपूर्वीच बोलला असता, तर आजपर्यंत इतकं रामायण घडलंच नसतं. इतिहास असो की वर्तमान मौन आणि मोघम भूमिका महाराष्ट्राला कायम नडत आलीय. या अश्याच मौनामुळे मागच्या 20 वर्षांपासून महाराष्ट्र दर 5 वर्षांनी आणि दर निवडणुकांच्या तोंडावर भांडलाय आणि भांडतोय.